
Donald Trump Jr wedding Bettina Anderson Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जेष्ठ सुपुत्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ज्युनियर आणि त्यांची पत्नी बेटिना अँडरसन यांच्या विवाह (Trump Jr Wedding) सोहळ्याशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे. मे २०२६ मध्ये बहामासमधील एका खासगी बेटावर पार पडलेल्या या भव्य विवाह सोहळ्यानंतरच्या दोन रात्रींच्या उत्सवाचा लाखो डॉलर्सचा खर्च रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याने केला असल्याचे उघड झाले आहे. रशियन उद्योगपती आणि ‘इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन’चे (IBA) अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह (Umar Kremlev) यांनी या सोहळ्यातील मोठ्या खर्चाचा भार उचलल्याचे समोर आले आहे.
‘प्रोपाब्लिका’ (ProPublica) या प्रख्यात शोधपत्रकारिता करणाऱ्या संस्थेने यासंदर्भात एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, बहामासमधील तीन दिवसांच्या या सोहळ्यासाठी लागणाऱ्या दोन खाजगी बेटांपैकी एका बेटाचे भाडे, पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था, भव्य पार्ट्या आणि लाखो रुपयांची फटाक्यांची आतषबाजी या सर्व गोष्टींचा खर्च क्रेमलेव्ह यांनी दुबईस्थित एका संस्थेमार्फत केला होता. उमर क्रेमलेव्ह हे व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील मानले जातात आणि त्यांच्यावर युक्रेनकडून निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या कौटुंबिक सोहळ्यात रशियन वकिलातीशी व क्रेमलिनशी संबंध असलेल्या व्यक्तीचा इतका मोठा आर्थिक सहभाग पाहून अमेरिकेतील विरोधक आणि गुप्तचर तज्ज्ञांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
उमर क्रेमलेव्ह हे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे (IBA) प्रमुख असून रशियातील एक प्रभावशाली आणि श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. रशियन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. रशियाच्या गॅझप्रॉम (Gazprom) या सरकारी ऊर्जा कंपनीशीही त्यांच्या असोसिएशनचे मोठे आर्थिक व्यवहार राहिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Breakup: ब्रिटनच्या विघटनाची नांदी? स्कॉटलंड, वेल्स अन् उत्तर आयर्लंड स्वातंत्र्यासाठी एकत्र; ट्रम्पच्या विधानाने ओतले आगीत तेल
ट्रम्प ज्युनियरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प ज्युनियर आणि उमर क्रेमलेव्ह यांची भेट एका सामायिक मित्राद्वारे शिकारीच्या (Hunting) छंदादरम्यान झाली होती. बॉक्सिंग आणि मैदानी खेळांमधील स्वारस्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. तथापि, ट्रम्प ज्युनियर यांच्याशी कोणताही व्यावसायिक किंवा राजकीय करार नसल्याचा दावा ट्रम्प कुटुंबाच्या वतीने करण्यात आला आहे. बहामासमधील या सोहळ्यात केवळ १८ कुटुंबीयांच्या उपस्थितीत मुख्य लग्न पार पडले, परंतु नंतरच्या पार्ट्यांमध्ये क्रेमलेव्ह आणि त्यांच्यासोबत आलेला रशियन नागरिकांचा एक मोठा गट उपस्थित होता, ज्याने उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
रशियन निधीच्या अहवालानंतर अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार वाद पेटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरची पत्नी बेटिना अँडरसन (Bettina Anderson) हिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत या सर्व वादावर स्पष्टीकरण दिले आहे. बेटिनाने अहवालातील आर्थिक सहभागाच्या वृत्ताला दुजोरा दिला, परंतु यामागे कोणता राजकीय किंवा कुटिल हेतू असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.
बेटिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “डॉन आणि मी २२ मे रोजी अत्यंत खाजगी वातावरणात, फक्त आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकलो. आमच्या या लग्नानंतरच्या दोन रात्रींच्या सुंदर उत्सवांचे यजमानपद आमचे प्रिय मित्र उमर क्रेमलेव्ह यांनी अत्यंत उदारतेने भूषवले. एका मित्राकडून मिळालेली ही अत्यंत अनमोल आणि उदार अशी लग्नाची भेट (Wedding Gift) होती, ज्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव आभारी आहोत.”
तिने पुढे लिहिले, “एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा तो कुठून आला आहे यावरून एका चांगल्या आणि वैयक्तिक आनंदाच्या क्षणाला राजकीय किंवा संशयास्पद वळण दिले जाणे दुर्दैवी आहे. मैत्रीसाठी कोणत्याही राजकीय हेतूची गरज नसते आणि उदारतेमागे नेहमीच कोणताही छुपा अजेंडा असतो असे नाही. कधीकधी लग्नाची भेट ही फक्त एक साधी भेट असते. यात कोणताही कट नाही आणि कोणतेही रहस्य नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस
जरी ट्रम्प कुटुंबाने हा प्रकार केवळ वैयक्तिक मैत्री आणि भेटवस्तू असल्याचा दावा केला असला, तरी अमेरिकन लोकप्रतिनिधी आणि सुरक्षा तज्ज्ञांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या हाऊस ओव्हरसाइट कमिटीचे वरिष्ठ डेमोक्रॅटिक नेते रॉबर्ट गार्शिया यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला की, “रशियन उद्योगपती उमर क्रेमलेव्ह यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर लाखो डॉलर्स खर्च केले. याच्या बदल्यात त्यांना काय मिळाले? या प्रश्नाचे उत्तर देशवासीयांना मिळणे गरजेचे आहे.”
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना आणि रशियन हस्तक्षेपावरून अमेरिकेत सातत्याने चर्चा होत असताना, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अत्यंत जवळच्या व राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या मुलाने रशियन ओलीगार्ककडून इतकी महागडी भेट स्वीकारल्यामुळे या मुद्द्यावरून येणाऱ्या दिवसांत अमेरिकन राजकारणात अधिक राजकीय वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.