Ambedkar Jayanti 2025 :- एक काळ असा होता ज्या काळात माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागणूक न देता जनावरालाही मिळेल इतकाही मान नव्हता. अस्पृश्य म्हणून जन्माला येण्यापेक्षा जन्माला न येणंच बरंच, केविलवाणं जीण जगण्यापेक्षा मरण शाप नाही तर आशिर्वाद म्हणावा अशी गत असलेल्या समाजात एक युगपुरुष जन्माला आला. ज्याने या सोशिक समाजाला आणि प्रत्येक समाजातील घटकाला अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षण नावाचं शस्त्र हाती दिलं. असा हा युगपुरुष म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब थोर समाजसुधारक होते, तज्ज्ञ राजकारणी होते, सुजाण पत्रकारही होते, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे निर्भड नेता होते. कणखर आणि समाजाच्या अनिष्ठ रुढींना झुगारणारे माणसाला माणूस असण्याचे हक्क मिळवून देणारे संघर्ष करणारे योद्धा देखील होते. रंजल्या गांजल्या सोशिक वर्गाचं पालकत्व स्विकारत बापासारखी कर्तव्य पार पाडणारा हा महामानव मनानेही तितकाच हळवा आणि संवेदनशील होता. करारी बाणा, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व याच बरोबर बाबासाहेबांची अनेकांना ज्ञात नसलेली बाजू म्हणजे राजकारणाव्यतिरिक्त त्यांचं कलासक्त असणं. राजकारणी असण्याबरोबरच बाबासाहेब कलाप्रेमी देखील होते. आणि त्यांचं हेच कलाप्रेम त्यांना कलेची उत्तम जाण असण्याची देखील साक्ष देतं.
रोजच्या आव्हानात्मक जगण्यातूनही चार घटका आनंदाचे जावेत म्हणून बाबासाहेब तबला, सारंगी असे वाद्य देखील वाजवत असे. लहानपणीच त्यांना त्यांच्या मोठ्या भावाकडून तबला वाजवण्याचं बाळकडू मिळालं होतं.फार कमी लोकांना माहिती आहे की, बाबासाहेब विद्यार्थी असताना त्यांनी शेक्सपियरच्या “किंग लिअर” नाटकाचे भाषांतर आणि दिग्दर्शन केले होते. एकंदरीत, बाबासाहेबांचं रंगभूमी आणि नाटकाशी जवळचं नातं होतं, हे यातून स्पष्ट होतं. परदेशात शिक्षणासाठी गेल्यावरही बाबासाहेब भारतातून नाटकांची पुस्तकं मागवत असे. एम.बी. चिटणीस यांनी लिहिलेल्या ‘युगयात्रा’ नाटकाची संकल्पना आणि कलाकृती देखील बाबासाहेबांचीच होती.
बाबासाहेबांच्या राजगृहाचे ग्रंथपाल शां. शं. रेगे त्यांच्या भीमपर्व या ग्रंथात लिहितात की, बाबासाहेबांना कलेविषयी प्रेम आणि आदर होता. संगीताची ही त्यांना आवड होती. बाबासाहेबांना व्हॉयलेन वाजवायचं देखील वेड होतं. वाढत्या वयानुसार त्यांना गाण्याच्या बैठकीत तासन तास अवघडत बसून राहणं शक्य नव्हतं. मात्र भजनं, नाट्यसंगीत किंवा भावगीतं त्यांना आवडत असत. काही जुन्या नाटकांतील पदे व काही लावण्या त्यांना पाठ होत्या. खुशीत असतील तेव्हा ते सुरेल स्वरात गाणी गात असायचे.
एकदा दादरला कोहिनूर सिनेमात मराठी बोलपट पाहून आल्यावर ‘तू असतीस तर…..झाले नसते’ हे त्यातले द्वंदगीत ते कित्येक दिवस सुरेल चालीत गुणगुणताना अनेकांनी ऐकले आहे. मुंबईस मुक्काम असताना ते मास्टर कृष्णरावांना मुद्दाम पुण्याहून बोलवीत आणि त्यांची नाट्यगीते त्यांच्याकडून गाऊन घेत असत. . मास्तरांकडून त्यांनी ‘बुद्धवंदना’ रेकॉर्डसाठी बसवून घेतली होती. एच.एम.व्ही. च्या स्टुडिओत आंबेडकरांना मास्टर कृष्णराव आपली चाल म्हणून दाखवीत आणि बाबासाहेब त्यांना स्वरयोजनेच्या सूचना कशा करीत हे पाहणे मोठे गमतीचे असे. मास्टर बाबासाहेबांना फार मानीत आणि त्यांच्या हाकेनुसार केव्हाही येऊन ते त्यांना गाऊन दाखवत. बहुधा हे गाणे कसल्याच वाद्याच्या साथीशिवाय चाले आणि ताल असे तो मास्तरांच्या आणि बाबासाहेबांच्या टाळ्यांचा,असं देखील म्हटलं जातं.
बाबासाहेबांना चित्रकलेचाही छंद होता. याबाबत शां. शं. रेगे लिहितात की, “चर्चिलचे ‘पेंटिंग एज अ पास्ट टाईम’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना चित्रकलेचा नाद लागला, थाकर कंपनीतून त्यासाठी चित्रकलेच्या वह्या , स्केच बुक्स, खडूच्या-रंगाच्या पेट्या, रबर आणि चित्रकलेच्या अभ्यासाची मिळतील तेवढी विविध प्रकारची पुस्तकं त्यांनी विकत घेतली आणि दिल्ली-मुंबईच्या वास्तव्यात दररोज वेळ काढून चित्रे काढण्यास व रंगवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी चित्र काढलेल्या वह्या त्यांच्या संग्रहात आढळल्या त्यावरून त्यांच्या ह्या उत्तम कलाभ्यासाची जाणीव होते.
” बाबासाहेबांनी १९४० साली ह. वि. देसाईंना दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रकलेविषयी बोलताना बाबासाहेब म्हणतात, “खरंच, माझ्याकडे चित्रं विकत घेण्याइतके पैसे नाहीत. नाहीतर पुस्तकांप्रमाणेच मी चित्रेही घेतली असती विकत ! मला हिंदी चित्रकला जशी आवडते तशीच इटालियन चित्रकलाही आवडते! मी ऑक्सफर्ड येथे असताना माझ्याचबरोबर बेव्हन नावाचा एका सधन गृहस्थाचा भाऊ होता. त्याच्यामुळे बेव्हनची आणि माझी ओळख झाली. बेव्हन हा मोठा सधन व्यापारी होता. पण ब्रिटीश म्युझियमपेक्षाही त्याच्याजवळ मोठा चित्रसंग्रह होता. त्याने हजारो पौंड चित्रे खरेदी करण्यासाठी खर्च केले होते. पुढे बेव्हन अफरातफरीच्या आरोपात तुरुंगात गेला. पण माझा त्याच्याविषयीचा आदर मात्र कमी झाला नाही. याचे कारण त्याचा चित्रसंग्रह पाहिल्यामुळे माझ्या मनावर अनुकूल परिणाम झाला होता. त्यांच्या रसिकतेमुळे माझ्या मनात आदर निर्माण झाला होता.” असा संदर्भ देखील सांगितला जातो. बाबासाहेबांना चित्रकलेचाही छंद होता. याबाबत शां. शं. रेगे लिहितात की, “चर्चिलचे ‘पेंटिंग एज अ पास्ट टाईम’ हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना चित्रकलेविषयी ओढ वाटायला लागली.
बाबासाहेबांचे साहित्यविषयक विचारसौंदर्य याविषयी लिहिताना प्राध्यपक रुपेश नरहरी कऱ्हाडे , यवतमाळ असं लिहितात की, बाबासाहेबांवर संतांच्या अभंगांचा देखील प्रभाव होता. तुकोबांच्या साहित्याविषयी बाबासाहेबांना नितांत आदर होता. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून किर्तनातून समाजप्रबोधन घडवून आणलं होतं. याचकारणाने बाबासाहेब तुकोबांच्या अभंगांशी जोडले गेले होते. समाजहितासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या या महामानवाला कलेविषयी तितकाच जिव्हाळा होता हे यातून स्पष्ट होते.