Fatima Hassouna the brave photographer from Gaza who lost her life in an Israeli airstrike
गाझा सिटी : “जर मी मेले तर मला असा मृत्यू हवा आहे, ज्याचा आवाज दूरवर प्रतिध्वनीत होईल.” ही हृदयस्पर्शी ओळ लिहिणाऱ्या २५ वर्षीय फातिमा हसौना या गाझामधील धाडसी छायाचित्रकार ज्यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. ती केवळ फोटो जर्नलिस्ट नव्हती, तर ती गाझातील जनतेचा आवाज आणि वेदनांचा दस्तऐवज होती, जिने मृत्यूच्या छायेखाली राहूनही कॅमेरा कधी खाली ठेवला नाही.
फातिमाला तिच्या कामाचे गांभीर्य होते. ती म्हणायची, “मला केवळ आकडेवारी किंवा ब्रेकिंग न्यूज ठरायचं नाही. मला अशी प्रतिमा मागे सोडायची आहे जी वेळ किंवा जमीनही दफन करू शकणार नाही.” तिचा मृत्यू झाला असला तरी तिची ही भावना तिच्या प्रत्येक छायाचित्रातून आजही जिवंत आहे.
फातिमा लवकरच विवाहबंधनात अडकणार होती, परंतु नियतीच्या क्रूर फेऱ्यात ती आणि तिच्या १० कुटुंबीयांचा आयुष्याचा प्रवास अचानक संपला. या हल्ल्यात तिची गर्भवती बहीण देखील मृत्युमुखी पडली. मृत्यूच्या काही तास आधीच तिची इराणी चित्रपट निर्माती सेपिदेह फारसी यांच्याशी बोलणी झाली होती. फातिमाला तिच्या व्हिडीओ कार्यासाठी ‘पुट युअर सोल ऑन युअर हँड अँड वॉक’ या माहितीपटात स्थान देण्यात आले होते, जो फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या समांतर चालणाऱ्या स्वतंत्र चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ओमानच्या मध्यस्थीने इराण-अमेरिका ‘अणु’ चर्चेला गती; मध्यपूर्वेतील संघर्ष शमणार का?
फातिमाचे संपूर्ण आयुष्य गाझामधील विनाशकारी वास्तवाचे दस्तऐवजीकरण करण्यात गेले. तिने घरांचे उद्ध्वस्त अवशेष, स्थलांतरितांचे दुःख आणि ११ नातेवाईकांच्या मृत्यूचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केले. तिच्या दृष्टिकोनातून गाझा जगासमोर पोहोचवण्याचा तिला प्रामाणिक प्रयत्न होता. तिची धडाडी, निष्ठा आणि कलेतील सच्चेपणा तिच्या प्रत्येक फ्रेममध्ये झळकतो.
Fatima Hassouna, a photographer documenting israeli atrocities since the start of the genocide, is killed by the israelis with 10 members of her family pic.twitter.com/VqWT7ED3Zc
— Sarah Wilkinson (@swilkinsonbc) April 16, 2025
credit : social media
फातिमाचा मृत्यू ही केवळ दुर्घटना नव्हती, असा सेपिदेह फारसी आणि इतर कार्यकर्त्यांचा संशय आहे. गाझामध्ये गेल्या १८ महिन्यांत १७० ते २०६ पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे पत्रकारिता करणे हीच एक धोक्याची बाब बनली आहे. फातिमाच्या मृत्यूला जाणूनबुजून टार्गेट करणं होतं का? हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित होतो आहे. इस्रायली सैन्याने हल्ला हमास सदस्यांवर केंद्रित असल्याचं म्हटलं असलं तरी फातिमा आणि तिचे कुटुंब सर्वसामान्य नागरिक होते.
७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या युद्धात गाझामध्ये ५१,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुसंख्य महिला आणि लहान मुले आहेत. मार्च २०२४ पासून युद्धबंदीचा भंग झाल्यानंतर हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढली असून केवळ एका दिवशी ३० हून अधिक बळी गेले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिलसा डिप्लोमसी; 70% निर्यात एकटा बांगलादेश करतो
फातिमा हसौना गेली असली तरी तिचे विचार, तिचा कॅमेरा आणि तिच्या छायाचित्रांमधून झळकणारा गाझाचा आवाज आजही जगाला साद घालत आहे. तिचा मृत्यू केवळ एक पत्रकार गमावण्याइतका मर्यादित नाही, तर ते मानवतेवर घातलेलं गहिरं व्रण आहे. फातिमाने ज्या शब्दांनी तिच्या शेवटचा प्रवास सजवला, ते शब्द आता युद्धाच्या अंधारात प्रकाशाचा किरण बनून उठले आहेत,
“जर मी मेले तर असचं मरेन…”