फोटो सौजन्य: Freepik
सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आपल्याला बाप्पाची सुंदर आणि मधुर गाणी ऐकायला मिळत आहे. पण प्रत्येक वर्षी एक गाणं असं आहे ज्याशियाय गणेशोत्सव आला आहे असे वाटत नाही. ते गाणं म्हणजे ‘बाप्पा मोरया रे’.
लोककवी हरेंद्र जाधव यांचे अप्रतिम बोल आणि प्रल्हाद शिंदे यांच्या मधूर आवाजाने नटलेलं गाणं म्हणजे बाप्पा मोरया रे.’ आज या गाण्याला कित्येक वर्ष झाली असली तरीही लोकांच्या मनात आजही या गाण्याबद्दल स्थान आहे. एवढेच काय, आजकालच्या तरुण पिढीलासुद्धा या लोकभक्तिगीताने भुरळ पाडली आहे. पण कधी तुम्ही या गाण्याचे बोल नीट ऐकले आहे का? या गाण्याचा इतिहास तुम्हाला माहित्ये का? आपण अनेकदा गाणी ऐकतो पण त्यामागे घडलेल्या गोष्टीही तितक्याच रंजक असतात. आज या लेखातून अशीच एक रंजक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.
हे देखील वाचा: भक्तांची विघ्ने हरण करणारा ओझरचा विघ्ननेश्वर; अष्टविनायकातील पाचवा गणपती
गाण्याच्या ‘बोलाची’ गोष्ट
तुम्ही जर हे गाणं नीट कान देऊन ऐकले असेल तर तुम्हाला जाणवेल यात गणपती बाप्पाची स्तुती नाही तर त्याच्याकडे आपली व्यथा मांडली जात आहे. तुम्ही कधी लाल गव्हाचे मोदक पहिले आहे का? जास्त लोकांचे उत्तर हे नाही असे असेल. पण मग ‘केले मोदक लाल गव्हाचे’ असे का बोलले जाते. तर यामागे सुद्धा एक गोष्ट आहे.
हे गीत लिहिताना कवीने सत्तरीच्या दुष्काळातील काळातील वेदना आपल्या लेखनातून कोरली आहे. जेव्हा एखादे गीतातून समाजाची व्यथा, वेदना आणि संवेदना मांडली जाते तेव्हा ते फक्त गीत नाही तर लोकगीत होते. चला आपण या गाण्यातील एक ओळ आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून घेऊया.
काय आहेत ओळी
नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे?
सेवा जाणून, गोड मानून द्यावा आशीर्वाद आता
बाप्पा मोरया रे ||
ओळींमागील भावना
सत्तरीच्या काळात भयंकर दुष्काळ पडला होता. लोकांकडे खाण्यास धान्य उरले नव्हते. तेव्हा उपाय म्हणून सरकारने अमेरिकेतून लाल गहू आयात केला होता. तेव्हा त्याकाळची लोकं हा लाल गहू खाऊन आपले पोट भरायचे. हीच व्यथा कवीने या गाण्यात अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे. यामुळेच हे गाणं त्याकाळी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आज आपल्याकडे दुष्काळाची परिस्थती नाहीये. तरीसुद्धा ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणं वाजलं नाही तर गणेशोत्सव साजरा केलाय असं अजिबात वाटत नाही.
कशी वाटली ही तुम्हाला गाण्यामागची कथा, आम्हाला नक्की कळवा.