अष्टविनायकातील चौथा गणपती रांजगावचा महागणपती
महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाले असून त्यांच्या दर्शनासाठी लाखो भक्तजण विविध मंदिरांना भेट देत आहेत. विशेषत: अष्टविनायक गणपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक या मंदिरांना भेट देत आहेत. महाराष्ट्रात गणपतीची प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरे. एकूण आठ रूपात गणपती बाप्पाची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रांजणगावचा महागणपती, गणेशाचे स्वयंभू स्थान असलेला. आपण आज या गणपतीची माहिती जाणून घेणार आहोत.
गणेशाचे स्वयंभू स्थान, रांजणगावचा महागणपती
रांजणगावचा महागणपती अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. हा महागणपती स्वयंभू असून पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासुर नावात्या दैत्यास भगवान शंकरांनी त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्याला काही शक्ती प्रदान केल्या होत्या. त्रिपुरासुराने शक्तींचा दुरूपयोग करून स्वर्गलोकातील देवी-देवतांना आणि पृथ्वी तलावरील लोकांना त्रास दिला. त्याच्या या त्रासामुळे अनेकांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गणेशाचे नमन केले. त्यांनी गणेशाला असुराचा नाश करण्याचे आवाहन केले. म्हणून श्री गणेशाने त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे रांजणगावातील या महागणपतीला त्रिपुरारिवदे महागणपती देखील म्हटले जाते. त्यामुळे गणपतीच्या अष्टविनायकातील या रूपाला सर्वात शक्तिशाली गणपती मानले जाते. गणेशाचे स्वयंभू स्थान असलेल्या या श्री महागणपतीची सोंड उजव्या बाजूला असून गणेशाचे आसन कमळाचे आहे. गणपती बाप्पाचे हे मंदिर पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे.
महागणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्ये
पुण्यापासून ५१ किमी अंतरावर असलेले हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित ‘अष्टविनायकां’मधील चौथे मंदिर आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे मंदिर 9व्या-10व्या शतकात बांधले गेले. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विशाल दवरपाल बांधलेले आहेत. या मंदिराची रचना अशी आहे की, जेव्हा सूर्य दक्षिणायन आणि उत्तरायणात असतो तेव्हा सूर्याची किरणे थेट गणेशाच्या स्वयंभू मूर्तीवर पडतात. गणपती बाप्पा या मंदिराच्या गर्भगृहात ‘महागणपती’च्या रूपात विराजमान आहे. त्यांच्या या अप्रतिम मूर्तीचे कपाळ खूपच रुंद असून सोंड दक्षिणेकडे वाकलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी बसलेले आहेत. या मंदिरात असलेल्या मूळ मूर्तीला महापातक म्हटले जाते. मंदिराचे सध्याचे गर्भगृह 1790 मध्ये माधवराव पेशवे यांनी बांधले होते आणि मंदिराचा मुख्य सभामंडप इंदूरच्या सरदार किबे यांनी बांधला होता. गणेश चतुर्थी हा येथील विशेष सण आहे. याशिवाय रविवार आणि बुधवारीही येथे भाविकांची गर्दी दिसून येते.
कसे जायचे?
मंदिराला भेट देण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर मंदिराच्या सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे. हे अंतर तुम्ही फक्त 46 किमी असून 1 तासांत पार करू शकता. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मंदिराचे अंतर सुमारे 195 किमी अंतरावर आहे. तसेच रांजणगावचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन देखील पुणे आहे, जे येथून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. याशिवाय शिरूर स्टेशनपासून मंदिराचे अंतर जेमतेम 20 किमी आहे. रांजणगाव पुणे-अहमदनगर महामार्गावर वसलेले आहे. पुणे आणि शिवाजी नगर येथून रांजणगावला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशिवाय इतर अनेक वाहतूक साधने उपलब्ध आहेत.