
International Day for the Elimination of Violence against Women
जग बदलत चालल्याच्या चर्चा आपण सतत करत असतो. या क्षेत्रात हा बदल झाला, त्या क्षेत्रात तो बदल झाला, हा शोध लागला, तो शोध लागला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपण करत असतो. अगदी महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कशा पुढे जात आहेत यावर देखील आपण चर्चा करतो. पण खरंच समाज बदलत चाललाय का? आजही महिलांना त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्यासाठी का लढावे लागत आहे? कित्येक महिलांना घरकाम करुनच मग नोकरीसाठी बाहेर पडावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या, हुंडा बळीच्या घटाना काही थांबवण्याचे नाव घेईनात.
नुकतेच मालेगावमध्ये एक संतापजनक घटना घडली होती. एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर २४ वर्षाच्या माणसाच्या वेशात असणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याच्यार केला. बर तो एवढ्यावरच थांबला नाही. तिची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्याही केली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडला होता. हे एवढेच प्रकरण नाही. तर देशात, जगात अनेक ठिकाणी आजही महिला हिंसाचाराला बळी पडत आहेत. कुठे घरगुती हिंसाचाराला, तर कुठे हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात आहे.
अन् यामुळे आजही जग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिनाची गरज भासत आहे. गेल्या काही वर्षात महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये केवळ वाढ होत आहे. WHO च्या सर्वेक्षणानुसार, आजही जगातील ३ पैकी १ महिला हिंसाचाराला बळी पडत आहे.
आज २५ नोव्हेंबर महिलांवरील अत्याचार निर्मूलन दिवस आहे. ही तारीख आपल्याला अशी कितीतरी महिलांवरील आतापर्यंत घडलेल्या अत्याचाराची आठवण करुन देते. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने (UNGA) या दिनाची घोषणा केली होती. जगभरातील महिलांवरील लैंगिक अत्याचार , घरगुती हिंसाचार आणि इतर अनेक प्रकारच्या अत्याचाराला बळी पडत आहेत आणि हे थांबवण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवसाचा उद्देश महिलांवरील हिंचासार रोखणे, तसेच महिलांचे हक्क, लिंग समानता आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आहे. महिलांना आपल्या घरात, आसपासाच्या परिसरात, शहरात, राज्यात देशात आणि जगभरात मुक्त जीवन जगता यावे यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली.
महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस हा दरवर्षी २५ नोव्हेंबरला साजरा करतात आणि दरवर्षी यासाठी एक उद्देश निश्चित करण्यात येतो. यंदा २०२५ साठी लाखो महिला आणि मुलींवर वाढत्या डिजिटल अत्याचाराला थांबवण्याचा आहे. जगभरातील वेगाने वाढ होणाऱ्या अत्याचाराचा हा एक प्रकार आहे.
मुलींचा सोशल मीडियावर पाठलाग, त्यांना स्टॉक करणे, सतत मेसेज पाठवणे, त्यांची वैयक्तिक माहिती उघड करणे, त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो शेअर करणे, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने डिपफेक-फोटो व्हिडिओ बनवून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवणे हे या डिजिटल अत्याचारामध्ये घडते. याला आळा घालण्यासाठी आजचा हा दिवस आहे.
आजचा दिवस हा आपल्याला जागरुक करण्यासाठी आहे. महिला सुरक्षिततेसाठी हक्क मागणार नाहीत, तर तिला गृहित धरलेल्या समाजाविरोधात, तिच्या छळ करणाऱ्याविरोधात उभे राहण्याचा दिवस आहे आणि ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, आपल्या घरातील,परिसरातील महिलांना सुरक्षितपणे वावरता याच्या काळजी घेतली पाहिजे, तरच आपण प्रगतीच्या दिशने वाटचाल करत आहोत असे म्हणणे योग्य होईल.