
कलेवर नितांत प्रेम आणि बाबासाहेबांप्रति असलेली अपार निष्ठा असलेला हा सच्चा कलावंत म्हणजे नामदेव व्हटकर. असं म्हणतात की, प्रतिकूल परिस्थितीची जाण कलेला जन्म देते. एक उत्तम लेखक, कवी, कुशल राजकारणी आणि फोटोग्राफर असलेला हा अष्टपैलू कलाकार. काळाच्या ओघात व्हटकरांचं नाव कुठेतरी हरवून गेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचे जे काही दुर्मिळ फोटो आणि व्हिडीओ उपलब्ध आहेत ते केवळ आणि केवळ नामदेव व्हटकर यांच्या मेहनतीमुळे.
कोल्हापूरच्या रांगड्या मातीने कुस्तीपट्टू आणि राजकारणी दिले तसंच निष्ठावंत कलाकार देखील दिले. त्यातलंच एक नाव म्हणजे नामदेव व्हटकर. जातीवादात पोळून निघणाऱ्या समाजातला नामदेव व्हटकरांचा जन्म. त्यामुळे बंडखोरी जन्मत: त्यांच्यात रुजली होती. शेती, राजकारण, नाटक, सिनेमा, आकाशवाणी अशा विविध क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यासही होता आणि त्यांनी तितकंच योगदान देखील दिलं होतं. समाजाला जातीयतेची लागलेली कीड कशी दूर करता येईल, याबाबत त्यांनी अमूलाग्र बदल केले होते, त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. असं म्हणतात की, कला हा समाजाचा आरसा असतो. व्हटकरांनी जातीभेदाचा चिखल दूर सारण्यासाठी याच कलेचा आधार घेतलेला. व्हटकरांची त्यांच्या कलेवर आणि बाबासाहेबांवर अपार निष्ठा होती. इतकी की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचं चित्रिकरणासाठी व्हटकरांनी आपलं घरदार विकलं.
तो काळ होता 1956 चा. बाबासाहेब तेव्हा दिल्लीत होते. दलित चळवळ, कायदा सुधारणा तसंच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथासाठी ते दिल्लीत कामासाठी गेले होते. बाबासाहेब दिल्लीतील अलिपूर येथे राहत होते. मध्यरात्री झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. बाबासाहेबांचं पार्थिव दिल्लीतून मुंबईत आणण्यात आलं. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी भारतातून लाखो जनसमुदाय भारतात लोटला होता. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं चित्रिकरण करण्याचा निर्धार नामदेव व्हटकरांनी घेतला. व्हटकर तेव्हा मुंबईतच होते.
अंत्ययात्रा चित्रिकरणासाठी त्यांना लागणारं साहित्य खिशाला परवडणारं नव्हतं. त्यावेळी त्यांना सगळ्या साहित्याचा खर्च चौदाशे रुपये इतका झाला होता. इतके पैसै मोजण्याइतपत त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. व्हटकरांनी अंत्ययात्रेचं चित्रिकरण करण्याकरिता घरदार विकलं. व्हटकरांच्या सिनेसृष्टीत अनेक ओळखी होत्या. त्यांनी या मंडळींना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचं चित्रिकरण करण्याचं सांगितलं पण म्हणावा तसा समोरुन प्रतिसाद आला नाही. व्हटकरांना आर्थिक सहकार्य कोणीच केलं नाही. जसजशी गरज पडेल ते आपल्याकडील दागिने विकून पैशांची जमवाजमव करायचे. जेव्हा चित्रित केलेलं रेकॉर्डिंग एडीट करायची वेळ आली, तेव्हा लागणाऱ्या पैशांसाठी त्यांनी छापखाना विकला. आज जी बाबाबसाहेबांच्या अंत्ययात्रेचे ओरिजल व्हिडीओ पाहायला मिळतात, त्याचं एकमेव श्रेय हे नामदेव व्हटकरांना जातं. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं चित्रिकरणानंतर होते नव्हते सगळे पैसे संपले, त्यांनतर व्हटकरांना होती नव्हती मुंबईतली सगळी संपत्ती पुन्हा मिळवता आली नाही. मुंबईतलं राहतं घर आणि छापखाना विकल्यानंतर ते गावी स्थायिक झाले ते कायमचे. असा हा रांगड्या मातीतला कलावंत ज्याची बाबासाहेबांप्रति किती निष्ठा होती ते त्यांच्या धाडसी कार्यातून समोर आलं.
नामदेव व्हटकरांच्य़ा या कार्यावरच अभिनेता प्रसाद ओकने मुख्य भुमिका साकारलेल्या ‘परिनिर्वाण’ या सिनेमाचा टीझर गेल्या दोन वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. व्हटकरांना दलित मित्र मंडळाच्या वतीने गौरवण्यात देखील आलं. या निष्ठावंत कलाकाराने 1982 मध्ये जगाचा निरोप घेतला, तरी आजही त्यांनी केलेलं समाजकार्य आणि त्यांच्या साहित्यातून प्रत्येक निष्ठावंत कलाकाराच्या आठवणीत आहेत.