फोटो सौजन्य: Social Media
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, दलित समाजाचे नेते, कामगार आणि महिलांना महत्वाचे हक्क मिळवून देणारं एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व. त्यांचे अनुयायी त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणत. आज या थोर व्यक्तिमत्वाचे 68वे महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांचे लाखो अनुयायी आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीला भेट देत असतात.
महाराष्ट्र्राच्या मातीपासून दूर महू नावाच्या मध्यप्रदेशातील गावात जन्माला आलेले डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या मातीत अनेक क्रांतिकारी मोर्चे काढले. आपल्या समाजाला एक माणूस म्हणून जगता यावे यासाठी जंग जंग पछाडले. दलित समाजाचा उद्धार करण्यास त्यांना अनेक दिगज्जांची साथ लाभली. यात राजश्री शाहू महाराजांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याचे कारण म्हणजे महाराजांनी आंबेडकरांना केलेली आर्थिक मदत. याच आर्थिक मदतीमुळे आंबेडकरांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यास मदत झाली. तसेच ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ नावाची दोन मासिके सुद्धा सुरु करण्यास शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना मदत केली.
डॉ. आंबेडकरांनी आपल्या झंझावती आयुष्यात अनेक मंदिर प्रवेशासाठी लढे दिले. त्यातीलच एक विशेष गाजलेला मंदिर प्रवेश लढा म्हणजे 1930 सालचा काळाराम मंदिर प्रवेश लढा. खरंतर हा एक शांत मोर्चा होता, ज्याचा उद्देश फक्त दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा एवढाच होता. पण या मोर्च्याला हिंसक रूप तेव्हा आले जेव्हा सवर्णांनी दलितांवर दगडांचा मारा केला. यात डॉ. आंबेडकरांना सुद्धा जखमा झाल्या. यानंतर मात्र आंबेडकरांचे मन धर्मांतराकडे झुकत चाले होते.
एकीकडे गांधीजी सवर्णांचे मन परिवर्तन होईल असे आश्वासन आंबेडकरांना देत होते. पण आता आंबेडकरांना कळून चुकले होते की हिंदू धर्मातून जातीवादाचे उच्चाटन कधीच होणार नाही. त्यांच्या हेच द्वंद्व त्यांनी 1935 येथील येवला येथील सभेत बोलून दाखविले. ” मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातात नव्हते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही” असे उद्गार आंबेडकरांनी काढले आणि धर्मांतराबाबत आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. यावेळी नक्कीच असंख्य हिंदू मनांना आपलीच भावंडे आपल्यापासून दूर चालली आहे याची ठेच लागली असणार यात काही शंका नाही.
1939 साली डॉ. आंबेडकरांनी धर्मानंद कोसंबी यांची भेट घेतली होती. धर्मानंद कोसंबी हे जन्माने ब्राह्मण, हिंदू पण लहानपणापासूनच त्यांना बौद्ध धर्माची ओढ होती. बौद्ध धर्म जाणून घेण्यासाठी त्यांना लहानपणीच आपल्या घराला राम राम ठोकला. नेपाळ श्रीलंका असा प्रवास करत त्यांनी पाली भाषा समजून घेतली व तेथील लोकांना संस्कृत शिकवले.
असे हे थोर व्यक्तिमत्व मुंबईतील हिंदू कॉलनीत आपल्या कुटूंबाला भेटायला ७-८ दिवस येत असत. असेच एकदा ते आले असताना, त्यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट घेतली होती.
जेव्हा डॉ. आंबेडकर यांनी धर्मानंद कोसंबी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यात धर्मांतरावरून संभाषण झाले. बोलता बोलता आंबेडकर म्हणाले,” तुम्ही सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे, म्हणून तुमच्या आशिर्वादाला माझ्या लेखी फार मोठे महत्व आहे.”
यावेळी धर्मानंद यांनी आंबेडकरांना सूचक शब्दात सांगितले, “बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याआधीच मी मनाने बौद्ध झालो होतो. पण मी कधी धर्मांतराचा प्रचार केला नाही. हिंदू धर्माचा राग आल्यामुळे मी बौद्ध झालो असे नाही.”
आंबेडकर सुद्धा यावेळी परखडपणे म्हणाले,” माझा हिंदू धर्मावर राग नाही. अन्याय सहन न होऊन कधी कधी मी हिंदू धर्मावर टीका केली आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जातीवाद वगळता हिंदू धर्माची बाकी सर्व प्रमेय आवडतात.
पुढे आंबेडकर म्हणतात,” बौद्ध धर्मात जातीवाद नाही. पण हिंदू धर्मात तो राहिला. जर हिंदू धर्मात जातीवाद नसता तर मी हिंदू म्हणूनच जगलो असतो आणि मेलो असतो. मी हिंद धर्माचा त्याग रागाने नाही तर मजबुरीने करतो आहे.”
सदर लेख हा इंद्रायणी सावकार लिखित ‘संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम’ या पुस्तकातून घेतला आहे.






