Never Give Up Day 2025 Inspiring journey of those who rose from failure to success
Never Give Up Day 2025 : १८ ऑगस्ट हा दिवस जगभरात “नेव्हर गिव्ह अप डे” म्हणजेच कधीही हार न मानण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मानवी जीवनात अपयश, अडथळे, संघर्ष हे नेहमीच आले आहेत; पण त्यावर मात करून यश संपादन करणाऱ्यांची कहाणीच मानवजातीसाठी प्रेरणेचा खरा स्त्रोत ठरली आहे.
प्रेरणेची संकल्पना ही आधुनिक काळाची देणगी नाही. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याने चौथ्या शतकातच मानवी इच्छाशक्तीचे महत्त्व स्पष्ट केले होते. त्याने म्हटले होते “तर्क डोक्यात असतो, धैर्य छातीत असते आणि भूक पोटात असते.” याचा अर्थ असा की मानवी प्रेरणा ही शरीराच्या इच्छा, सुख-दु:ख आणि धैर्यावर आधारित असते. त्यानंतरच्या पुनर्जागरण काळात रेने डेकार्टेसने प्रेरणेला सक्रिय आणि निष्क्रिय घटकांत विभागले. त्याच्या मते, “इच्छाशक्ती हीच प्रेरणेची खरी शक्ती आहे.”
हे देखील वाचा : National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
मानवाच्या या इच्छाशक्तीचे अनेक प्रेरणादायी उदाहरणे आपल्याला इतिहासात आणि वर्तमानकाळात दिसतात. १९९२ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत ब्रिटनचा धावपटू डेरेक रेमंड्स याने ४०० मीटर शर्यतीत मध्यावर हॅमस्ट्रिंग फाडून घेतले. असह्य वेदना असूनही तो उभा राहिला आणि आपल्या वडिलांच्या साथीने अंतिम रेषेपर्यंत धावत गेला. शर्यत जिंकली नसली तरी, त्याची जिद्द जगभरातील कोट्यवधी लोकांच्या मनात कायमची कोरली गेली.
हॉलिवूडमधील अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन याची कहाणीही याच दृढनिश्चयाची साक्ष देते. संघर्षमय आयुष्यात “रॉकी” ही पटकथा लिहिल्यानंतर त्याला दिग्दर्शक मिळाले, पण त्याला नायक म्हणून कुणी संधी द्यायला तयार नव्हते. लाखो रुपयांच्या ऑफर नाकारून त्याने आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केले. अखेर त्यालाच मुख्य भूमिकेत घेतले गेले आणि “रॉकी” चित्रपटाने १९७६ मध्ये ऑस्कर जिंकले. ही केवळ कला नव्हती, तर संघर्षातून मिळालेल्या विजयाची कहाणी होती.
हे देखील वाचा : Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
ओप्रा विन्फ्रे, अर्नोल्ड श्वार्झनेगर, स्टीव्ह जॉब्स, लक्ष्मी मित्तल यांच्यासारख्या दिग्गजांनीही अपयश पचवून, कष्टातून, जिद्दीने स्वतःचे साम्राज्य उभे केले. त्यांच्या जीवनाचा समान धागा म्हणजे कधीही हार न मानण्याचा निर्धार.
“नेव्हर गिव्ह अप डे” हा दिवस आपल्यातील सुप्त नायकाला जागवण्याचा दिवस आहे. कठीण परिस्थितीत, अपयशानंतरही डगमगून न जाता नव्या जोमाने लढत राहण्याचा संदेश हा दिवस देतो. आजच्या तंत्रज्ञानयुगात यशाची शर्यत वेगवान झाली आहे. अशा काळात हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अपयश हे अंत नाही, तर नवी सुरुवात करण्याची संधी आहे. मानवी इच्छाशक्ती पर्वत हलवू शकते हे सत्य आजही तितकेच लागू होते. १८ ऑगस्टला साजरा होणारा “कधीही हार न मानण्याचा दिवस” हा केवळ दिनविशेष नाही, तर प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी संकल्प आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्यामुळेच माणूस असामान्य ठरतो. म्हणूनच, अपयश आलं की स्वतःला आठवण करून द्या “मी कधीही हार मानणार नाही!”