पुणे/वैष्णवी सुळके: आज जागतिक नृत्य दिवस नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ने भावना व आपल्यातील सामर्थ्य दाखवण्याचे प्रभावी माध्यम आहे. जी आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेने आधुनिक बॅले डान्सचे निर्माते जॉर्जेस नोवर यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. नृत्य ही एक अशी कला आहे, जी केवळ सादरकर्त्यालाच नाही, तर पाहणाऱ्यालाही सुखद अनुभव देते. अनेक प्रथितयश नृत्यांगनांच्या नृत्यकलेचा आस्वाद रसिक घेत असतातच, मात्र ज्या मुलीला निसर्गत:च ऐकण्याची आणि बोलण्याची अडचण होती तिने अथक परीश्रम घेत या उणीवांवरही लीलया मात करीत नृत्य कलेतील प्राविण्य मिळविले. तिच्या जिद्दीची गोष्ट आजच्या जागतिक नृत्य दिवसाच्या निमित्ताने!
कर्णबधीर असूनही अनेक आव्हानांना सामोरे जात नृत्यविश्वात अतुलनीय कामगिरी करणारी नृत्यांगना प्रेरणा सहानेने भल्या भल्यांना आपल्या कर्तृत्वाने अवाक केले. अवघ्या सहा महिन्यांची असताना तिला अर्धांगवायूचा झटका आला आणि तिचे श्रवणयंत्र पूर्णपणे निकामी झाले. सुरुवातीला हा धक्का न पचवू शकणाऱ्या तिच्या आई- वडिलांनी स्वत:ला सावरले. मूकबधीर, कर्णबधीर प्रेरणाला घडविण्याचा ध्यास घेत ती सात वर्षांची असताना तिला भरतनाट्यम् शिकवण्याचे त्यांनी ठरवले.
साधना विदयालयाच्या गुरु शुमिता महाजन यांनी मग संगीत, सूर, ताल हे काहीही अनुभवू न शकणाऱ्या प्रेरणाला भरतनाट्यम् शिकवण्याचे आव्हान स्विकारले. कधी काठीच्या वापराने तर कधी डोळयावर पट्टी बांधून घुंगरू वाजवून असे एक ना अनेक प्रयोग त्यांनी केले. अथक परिश्रम, घेऊन त्यांनी तिला नृत्यातील अनेक अदांमध्ये पारंगत केले. प्रेरणाच्या शरीरातच संगीत, सूर, ताल आहेत, त्यामुळे तिला वेगळ्या सुरांची, संगीताची आवश्यकता नाही हे लक्षात आल्यानंतर हा अत्यंत खडतर प्रवास अखेर येऊन पोहोचला तो अरंगेत्रम पर्यंत.
जिद्दीने, मेहनतीने प्रेरणाने ७ जून २००५ रोजी टिळक स्मारक मंदिरात आपल्या पदलालीत्याने उपस्थित नृत्यप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. तिच्या चपळ नृत्य अदकारीने सर्वांना आवाक करून सोडले. गायक आणि वादकांच्या साक्षीने एकटीचे अडीच तासांचे अरंगेत्रम सादर झाले. भरतनाट्यम सारख्या अवघड नृत्य प्रकारात तिने विशेष प्राविण्य मिळवल्याचे पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मग प्रेरणाने मागे वळून पाहिलेच नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर तिने ७५ पेक्षा आधिक कार्यक्रम सादर केले.
केदारनाथ, पद्मनाम यासारख्या अनेक ठिकाणी जाऊन आपला नृत्याविष्कार दाखवून तिने अनेकांना शारिरिक मर्यादा असतानाही आपल्या स्वप्नांचे अवकाश आपण पादक्रांत करू शकतो हेच दाखवून दिले. आपल्यातील जिद्दीच्या बळावर अनेक अडचणींवर मात करण्याची ताकद ती प्रत्येकाला देते. कला, जिद्द, चिकाटी, सामर्थ्याच्या बळावर या रणरागिणीस रोल मॉडेल राष्ट्रीय पुरस्कार, संघर्ष सन्मान पुरस्कार, रुक्मिणी पुरस्कार, भारत प्रेरणा पुरस्कारासह ३५ पेक्षा अधिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रेरणाची हृदयस्पर्शी कथा, तिच्या कठीण प्रवासाची ओळख आणि अविश्रांत मेहनीतीची जाणिव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आज ती मुलांना नृत्य शिकवते. कर्णबधीर आणि ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी ‘नृत्य शाळा’ सुरु करण्याचे तिचे स्वप्न आहे.
प्रेरणामध्ये ही कला जन्मजातच आहे. मी फक्त तिला मार्ग दाखवण्याचे काम केले. आमच्यामध्ये गुरू शिष्याचा जादुई बंध जुळल्याने हे अधिक सोपे झाले. परंतु,तिच्या कलेसाठी शासनाकडून सहाय्य मिळायला हवे. विविध महोत्सवांमध्ये सादरीकरणाची संधी प्रेरणाला मिळायला हवी. या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच तिला अधिक आर्थिक पाठबळ मिळेल.
– शुमिता महाजन (प्रेरणाच्या गुरु)
नृत्याची आवड तिच्यामध्ये दिसली होती. हे शिकण्यामुळे ती मुलांमध्ये मिसळेल, स्वतःतील न्यूनगंड विसरेल या उद्देशाने भरतनाट्यम शिकवण्याचे. तिला शिकवणे तिच्या गुरूंसाठी फार मोठे आव्हान होते. त्यांनी खूप कष्ट मेहनतीने तिला ही कला शिकवली. तिची प्रेरणा घेऊन अनेक दिव्यांग मुलं नवनवीन गोष्टी शिकतात. अनेक आव्हानांचा सामना करतं ती इथपर्यंत पोहोचली आहे.
– उज्वला सहाने (प्रेरणाची आई)