
सत्याग्रहाच्या वेळेसचे बाबासाहेबांचे ‘ते’ शब्द
चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी फक्त पाण्यासाठीच नव्हता केला. ती नांदी होती समतेची, बंधुतेची आणि समानतेची. ती नांदी होती हक्कासाठी लढण्याची, अस्तित्वासाठी ठामपणे उभं राहण्याची. आणि म्हणूनच आजच्या काळात देखील या सत्याग्रहाचं गांभीर्य तितकंच मोठं आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी बाबासाहेबांनी संपूर्ण अस्पृश्य समाजाला सांगितलं होतं, हे “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजतागायत आपला समाजाने कोण चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचं ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.
” ज्या चवदार तळ्याचं पाणी सवर्ण पितात, पक्षी प्राणी पितात मग माणसासारखे माणूस आपणं केवळ जातीय वादामुळे पाण्यावाचून तडफडायचं ? हा कोणता न्याय ? मुळात पाणी हे प्रत्येक सजीवाची तहान भागवतं जे निसर्गाने निर्माण केलं त्यावर ठराविक वर्गाने स्वत:ची मक्तेदारी का करावी ? अमर होण्यासाठी नाही तर आपल्याला देखील जगण्याचा हक्क आहे ते पटवून देण्यासाठी. पाण्यासाठी चवदार तळ्याच्या पायरीवर हिंदू, शिख ख्रिश्चन, मुस्लीम प्रत्येकजण समान आहे. हेच बाबासाहेबांनी पटवून दिलं.
यातूनच प्रेरित झालेल्या बाबासाहेबांनी पुढे देशाचं संविधान लिहिलं. सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली. खरंतर बाबासाहेबांची ही लढाई सवर्ण विरुद्ध अस्पृश्य अशी कधी नव्हतीच. ती लढाई होती ते जातीयवाद विरुद्ध समानतेची. यामध्ये बाबासाहेबांना काही सवर्णांनी देखील मदत केली होती. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. चवदार तळ्याच्या या सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क आहे. आणि तो हक्क देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आज बाबासाहेबांमुळे मिळाला आहे.