World Sickle Cell Day 2025 : सिकलसेल ॲनिमियासारख्या गंभीर अनुवांशिक आजाराविरुद्ध जनजागृती आणि प्रतिबंधासाठी १९ जून रोजी ‘जागतिक सिकलसेल जागरूकता दिन’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील ग्रामपंचायत तालुनच्या क्रीडा स्टेडियममध्ये भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांच्यासह अनेक मंत्री व वरिष्ठ लोकप्रतिनिधी सहभागी होत आहेत.
या महत्त्वपूर्ण दिवसानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विशेष संदेश दिला असून, मध्य प्रदेश सरकारच्या सिकलसेल निर्मूलनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले आहे. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात सांगितले की, “सिकलसेल ॲनिमियामुळे विशेषतः आदिवासी समाजाला फार मोठा फटका बसतो. त्यामुळे या आजाराच्या उच्चाटनासाठी सरकार, समुदाय आणि नागरिक यांचा समन्वय अत्यावश्यक आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे ‘हे’ शस्त्र इराणच्या घरात घुसून घालू शकते धुमाकूळ; 300 फूट खाली लपलेला ‘Fordow Plant’ धोक्यात
राष्ट्रपतींनी सांगितले की, २०४७ पर्यंत भारताला सिकलसेल ॲनिमियामुक्त करणे हा राष्ट्रीय संकल्प आहे. या उद्दिष्टासाठी ‘राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन अभियान’ राबवले जात असून, त्याअंतर्गत सिकलसेल बाधितांसाठी एकात्मिक उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर रुग्णांना मोफत औषधे, समुपदेशन आणि उपचार सेवा पुरवण्यात येतात. या संदर्भात राष्ट्रपती म्हणाल्या, “आपण सर्वांनी सतत, समर्पित आणि मानवतावादी दृष्टिकोनातून एकत्र काम केल्यासच सिकलसेल ॲनिमियाला मुळापासून नष्ट करणे शक्य होईल. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी देशातील प्रत्येक नागरिकाचे निरोगी असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार विशेषतः आदिवासी व मागास भागांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो, आणि तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो. त्यामुळे राष्ट्रपतींनी जनजागृती, अनुवांशिक समुपदेशन, स्क्रीनिंग चाचण्या व वेळेवर निदान यावर विशेष भर देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनीही सिकलसेलविरोधातील लढ्यात आपली कटिबद्धता दर्शवली असून, राज्यभरात मोफत तपासण्या, शिबिरे आणि उपचार उपक्रम राबवले जात आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘मी आता काळ आहे, जगाचा संहार करणारा…’ वाचा नक्की कोण आहे जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारा ‘हा’ माणूस?
राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या संदेशाच्या शेवटी पुन्हा एकदा नागरिकांना साकडे घातले की, “सिकलसेल अॅनिमियाच्या निर्मूलनासाठी केवळ शासनच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने आपली भूमिका पार पाडली पाहिजे. एकत्रित प्रयत्नांनीच आपण हा आजार भारतातून कायमचा दूर करू शकतो.” जागतिक सिकलसेल दिन २०२५ निमित्त हा कार्यक्रम केवळ एक औपचारिकता न राहता, भारताला सिकलसेलमुक्त करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाची मजबूत पायाभरणी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.