38th National Games 2025 Maharashtra wins overall title in Modern Pentathlon Diksha Yadav Saurabh Patil's medal hat-trick
हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदकांची बाजी मारून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये दिक्षा यादवने वैयक्तिक व सांघिक गटात सुवर्णयशाला गवसणी घातली. मिश्र प्रकारातही दीक्षा यादव व सौरभ पाटीलने रूपेरी यश संपादून पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
चौथा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णदिन
गौलापार येथे संपलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग चौथा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णदिन ठरला. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये महाराष्ट्राची दीक्षा यादवने चमकदार कामगिरी केली. तिने 946 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तिची सहकारी मुग्धा वाव्हळ 921 गुणांसह दुसर्या स्थानावर राहिली. उत्तराखंडची भार्गवी रावत 916 गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.
सांघिक प्रकारात दीक्षा संदीप यादव, मुग्धा वाव्हळ आणि दिप्ती काळमेघने 2749 गुणांसह सुवर्णपदक जिंकले.उत्तराखंडच्या संघाने महाराष्ट्राला चिवट लढत दिली आणि 2419 गुणांसह रौप्य पदक जिंकले. हरियाणाच्या संघाने 2022 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. मिश्र प्रकारात 824 गुणांची कमाई करीत दिक्षा यादव व सौरभ पाटीलने रौप्य पदकावर नाव कोरले. 839 गुणांसह मध्यप्रदेशच्या जोडीने सुवर्णपदक पटकवले.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अद्भूत यश
महाराष्ट्राच्या पुरूष संघाने 4 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य तर महिला संघाने 5 सुवर्ण, 3 रौप्य पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकविला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी विजेतेपदक पटकविणार्या महाराष्ट्र संघाचे मैदानात भेटून अभिनंदन केले. यावेळी भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाचे विठ्ठल शिरगांवकर, निलेश नाईक, शेखर खासनीस आदी मान्यवर उपस्थित होते.