AFG vs PAK: Afghanistan's Mohammad Nabi creates history in T20; achieves 'this' feat in world cricket
AFG vs PAK : आशिया कप २०२५ पूर्वी, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात T20 सामन्यांची तिरंगी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत अफगाणिस्तान संघाने मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला १८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू आणि माजी कर्णधार मोहम्मद नबीने रोजी एक मोठी कामगिरी केली आहे. मोहम्मद नबी हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा अफगाणिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच तो असे करणारा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे.
बांगलादेशचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाकिब अल हसननंतर, मोहम्मद नबीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही किमया केली आहे. त्याने टी-२० मध्ये १००० हून अधिक धावा केल्या असून त्याने गोलंदाजीमध्ये १०० विकेट्स देखील टिपल्या आहेत. मोहम्मद नबीने मंगळवारी शारजाह येथे पाकिस्तानविरुद्ध हा भीम पराक्रम केला आहे.
मोहम्मद नबी अफगाणिस्तान संघाकडून आपला १३५ वा सामना खेळला. त्याने टी-२० च्या १२६ डावांमध्ये २२४६ धावा फटकावल्या आहेत. त्याच वेळी, त्याने १०० विकेट्स देखील टिपल्या आहेत. बांगलादेशच्या शाकिबने नोव्हेंबर २००६ ते जून २०२४ पर्यंत खेळल्या गेलेल्या १२९ सामन्यांमध्ये बांगलादेशसाठी २५५१ धावा आणि १४९ विकेट्स घेत त्याच्या टी-२० कारकिर्दीला निरोप दिला.
यूएईमध्ये खेळवण्यात येत असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेतील चौथ्या सामन्यात मंगळवारी नबीने चार षटके गोलंदाजी करून २० धावा देत दोन बळी टिपले आहेत. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानच्या डावात आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फखर जमानला बाद करून नबीने आपले विकेटचे खाते उघडले. १८ चेंडूत २५ धावा काढल्यानंतर डावखुरा फलंदाज फजलहक फारुकीकडे झेल देऊन बाद झाला. फखरचा हा विकेट टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नबीचा १०० वी विकेट होती. या सामन्यात नबीने ४ षटकात २० धावा मोजून २ बळी टिपले.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने अफगाणिस्तानकडून सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट टिपल्या आहेत. त्याने आतापर्यंत ९८ सामन्यांमध्ये एकूण १६५ बळी मिळवले आहेत. रशीद खानने या काळात दोन वेळा पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. मोहम्मद नबीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०१ बळी टिपले आहेत.