नवी दिल्ली: दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत बॅडमिंटनमध्ये दोन पदके निश्चित केली. अंतिम फेरीत धडक दिलेल्या आरती पाटील आणि सुकांत कदमकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिमनॅस्टिक हॉलमध्ये उपांत्य फेरीत २८ वर्षीय आरती पाटीलने आपली मैत्रीण हरियाणाची लतिका ठाकूर हिचे आव्हान २१-१८, २१-७ ने परतवून लावले. आता अंतिम फेरीत तिच्यासमोर भारताची अव्वल खेळाडू असलेली पॅरालिम्पिकपटू नित्याश्री हिचे आव्हान असेल.
खेलो इंडिया पॅरा गेम्समधील आरतीचे हे सलग दुसरे पदक असेल. पुनीत बालन ग्रुपचे आर्थिक पाठबळ लाभलेली आरती अजय रावत, अक्षय गजबे, वरद गजबे, राहुल पाटील आणि संयोगिता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
लताताई उमरेकर हिला कांस्यपदक
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील क्रीडा संचलनालयात मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आलेल्या नांदेडच्या ३५ वर्षीय लता ताई उमरेकर हिने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक मिळवले. उपांत्य फेरीत तिला नित्याश्रीने २१-६, २१-४ असे सहजपणे पराभूत केले. पदकाचा रंग बदलला असला तर अधिक आनंद झाला असता. पुरेसा सराव नसतानाही आपल्या संघाला कांस्यपदक जिंकून देऊ शकले, याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया लताताई हिने व्यक्त केली.
सुकांत कदम अंतिम फेरीत
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला आंतरराष्ट्रीय खेळाडू सुकांत कदमने फायनलमध्ये धडक दिली आहे. उपांत्य फेरीत सुकांतने हरियाणाच्या योगेशचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याच्यासमोर तमिळनाडूच्या नवीनकुमारचे आव्हान असेल.
आजपासून रंगणार अॅथलेटिक्सचा थरार
महाराष्ट्राच्या सुकांत कदम, प्रेम अले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. दुसर्या पर्वाचे आज स्पर्धेचे शानदार उद्घाटन केेंद्रिय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते झाले. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिम्नॉस्टिक्स हॉलमध्ये सुरू असलेल्या पॅरा बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सकाळपासूनच दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडविले. मराठमोळे पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सुकांत कदम, संदिप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत भाग्यश्री जाधव हे दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत.दुसरी खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 20 ते 27 मार्च दरम्यान दिल्लीत 3 क्रीडा संकुलात रंगणार आहे. आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी व टेबलटेनिस या 6 क्रीडाप्रकारात देशभरातील 1300 क्रीडापटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम व डॉ. कर्णी सिंग शूटींग रेंज सज्ज झाली आहे.