
38th National Sports Competition: महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी 'या' खेळात पटकवले 'सुवर्ण'पदक; जाणून घ्या
डेहराडून: महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिंपियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नमवित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफपर्यंत ताणलेल्या रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजी मारत सुवर्णभेद साधला. याचबरोबर गाथा खडके, वैष्णवी पवार व शर्वरी शेंडे या त्रिकुटाने रिकर्व्ह महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने हरयाणाच्या पारस हुडा व भजन कौर या जोडीला तोडीस तोड लढत दिली. उभय जोड्यांमध्ये एक एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. शेवटी ही लढत ४-४ अशी बरोबरीत सुटल्याने शूट ऑफमध्ये गेली. शूट ऑफमध्ये वन ॲरो शुटमध्ये विजय प्रस्थापित करत सुवर्ण पदक पटकाविले. हरयाणाच्या जोडीने ९,९ असा वेध घेतला. मग गाथानेही ९ गुणांचाच वेध घेतल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली होती. मात्र, बाबरेकरने मोक्याच्या वेळी १० गुणांचा वेध घेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.
गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे व मुक्ता मोडगी यांनी सांघिक महिला गटातून झारखंडच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत व कोमालिका बारी या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाचा ६-१ फरकाने पराभव करून महाराष्ट्राच्या झोळीत सुवर्णपदक टाकले. या संघास समीर म्हस्के यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राने ही दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे खेळाडू व चाहत्यांनी “जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय महाराष्ट्र टीम महाराष्ट्र’ अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले.
आजच्या सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, सचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे आदींसह संघटनेचे पदाधिकारी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा: 38th National Sports Competition: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने केली ‘कांस्य पदकाची’ कमाई
‘झारखंडच्या संघात दोन ऑलिंपियन व एक वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूचा समावेश होता. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. उलट झारखंडच्या संघावरच दडपण होते. म्हणून आम्ही कुठलेही दडपण न सुवर्ण पदकाच्या लढतीत फक्त नैसर्गिक खेळ करावा, असा कानमंत्र प्रशिक्षकांनी दिला होता. योजनेनेसार खेळ झाला अन् आम्ही दोन सुवर्णपदके जिंकण्यात यशस्वी ठरलो. मी वयाच्या आठव्या वर्षापासून तिरंदाजी खेळत आहे. मला या खेळाच्या मोठ्या व्यासपीठावर आणण्यात रणजित चामले सरांचा मोठा आहे. त्यांच्यासह विलास ढुमने व सागर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.’
– गाथा खडके
मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने केली ‘कांस्य पदकाची’ कमाई
मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीला 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंचा उपांत्य फेरीपूर्वीच पराभव झाल्याने मुष्टीयुद्धातील महाराष्ट्राचे हे एकमेव पदक ठरले आहे. 60 ते 63.5 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत ऑलिंपिकमध्ये तीन वेळा प्रतिनिधित्व करणार्या शिवा थापाला महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीने शेवटपर्यंत जिद्दीने लढत दिली.