मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने जिंकले कांस्य पदक
पितोडगड: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीला 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंचा उपांत्य फेरीपूर्वीच पराभव झाल्याने मुष्टीयुद्धातील महाराष्ट्राचे हे एकमेव पदक ठरले आहे. 60 ते 63.5 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत ऑलिंपिकमध्ये तीन वेळा प्रतिनिधित्व करणार्या शिवा थापाला महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीने शेवटपर्यंत जिद्दीने लढत दिली.
हरिवंशला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक स्तरावर अनेक पदके जिंकणारा शिवा या खेळाडूचे 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक निश्चित मानले जात होते त्यामुळेच त्याच्याविरुद्ध खेळताना हरिवंश याला फारशी संधी नव्हती. तरीही हरिवंश याने तीनही फेर्यांमध्ये शिवा याला कौतुकास्पद झुंज दिली. हरिवंश याने ही लढत गमावली तरीही प्रेक्षकांनी त्याच्या जिद्दीचे मनापासून कौतुक केले.
अकोला येथील खेळाडू हरिवंश याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. त्याने यापूर्वी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळा कांस्यपदक तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत एक कांस्यपदक जिंकले होते 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. 2021-22 चा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे तो सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघाला रौप्य, तर सायकलिंगमध्ये दुहेरी धमाका
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारातील कंपाउंड राउंड महिलामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, प्रितिका प्रदीप आणि पुर्वशा शेंडे यांच्या संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.
डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्णपदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले होते. धनुर्धारींनी मारलेला बाणाचा प्रत्येक वेध आणि त्यास मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे सुवर्णपदकाची लढत डोळ्याची पारणे फेडणारी ठरली. अदिती स्वामी (सातारा), मधुरा धामणगावकर आणि प्रितिका प्रदीप (पिंपरी चिंचवड) आणि पुर्वशा शेंडे (अमरावती) या महिला संघाने सुवर्ण पदकासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र, दोन वेळा मिळालेले ८ गुण महाराष्ट्राला महागात पडले अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा: 38th National Sports Championship : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघाला रौप्य, तर सायकलिंगमध्ये दुहेरी धमाका
महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखताना आज महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. महिलांच्या चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. या संघात वैष्णवी गाभणे संस्कृती खेसे, सिया ललवाणी आणि पूजा दानोळी यांचा समावेश होता. महाराष्ट्राने ही शर्यत पाच मिनिटे ३२.६४३ सेकंदात पार केली. हरियाणा (पाच मिनिटे २६.९२० सेकंद) आणि ओडिशा (पाच मिनिटे ३०.४२३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिने पाच फेऱ्यांचा समावेश असलेल्या ‘केरीन’ सायकलिंग या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले.






