ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेला टी-२० विश्वचषक हा क्रीडा प्रेमींसाठी विशेष पर्वणी आहे. सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी बांग्लादेश विरुद्ध नेदरलँड यांच्यात झालेल्या सामन्यात बांग्लादेशने नेदरलँडवर ९ धावांनी विजय मिळवला. टी २० विश्वचषकात बांग्लादेशचा पहिलाच सामना होता.
सामन्यात नेदरलँड संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेश संघाला २० षटकात आठ विकेट्स गमावून १४४ धावापर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून अफिफ हुसेननं सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर, नजमुल शांतोनं २५ धावा केल्या. नेदरलँड्सकडून व्हॅन मेकर्न आणि बेस डिल्डे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. इतर ४ गोलंदाजांना प्रत्येकी एक- एक विकेट मिळाली.
दरम्यान, १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन धक्के बसले. नेदरलँड्सचा संघाकडून कॉलिन अॅकरमननं एकाकी झुंज दिली. त्यानं ४८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला मदत मिळाली नाही. नेदरलँड्सचा संघ 20 षटकात 135 धावांवर ऑलआऊट झाला. हा सामना बांग्लादेशनं नऊ धावांनी जिंकला. बांग्लादेशकडून तस्किन अहमदनं चार, तर हसन महमूदनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, शाकिब अल हसन आणि सोमया सरकारला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.