फोटो सौजन्य -BCCI सोशल मीडिया
Indian team’s schedule after Champions Trophy 2025 : भारताच्या संघाने नऊ महिन्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने T२० क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अविश्वनीय कामगिरी केली आहे. आतापर्यत भारताच्या संघाने सलग तीन आयसीसी स्पर्धांमध्ये १५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये दोन आयसीसी ट्रॉफीचा समावेश आहे. आता टीम इंडियाच्या खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळणार आहे. त्यानंतर २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या इंडिया प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या सीझनमध्ये दिसणार आहेत.
चॅम्पियन ट्रॉफीचा जल्लोष साजरा करणाऱ्या चाहत्यांवर तेलंगणामध्ये लाठीचार्ज! BJP ने शेअर केला Video
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक फेरबदल पाहायला मिळाले अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. तर काही संघाचे कॅप्टन देखील बदलण्यात आले आहेत. आयपीएलचा आगामी हंगाम थोडा बदललेला दिसेल. या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावानंतर सर्व संघांचे स्वरूप बदलले आहे. येत्या हंगामात अनेक मोठे खेळाडू नवीन फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. त्याच वेळी, टीम इंडियाला फॉलो करणाऱ्या चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की भारताचा पुढील सामना कधी आणि कोणत्या संघासोबत होईल. यासंदर्भात संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
टीम इंडियाचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताचा संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी २० ते २४ जून दरम्यान लीड्समध्ये, दुसरी कसोटी २ जुलै ते ६ जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये, तिसरी कसोटी १० जुलै ते १४ जुलै दरम्यान लंडनमध्ये, चौथी कसोटी २३ ते २७ जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये खेळवली जाईल.
तारिख | सामना | वेळ | ठिकाण |
---|---|---|---|
20 जून | भारत विरुद्ध इंग्लंड | दुपारी 3:30 | लीड्स |
2 जुलै | भारत विरुद्ध इंग्लंड | दुपारी 3:30 | बर्मिंगहॅम |
10 जुलै | भारत विरुद्ध इंग्लंड | दुपारी 3:30 | लॉर्ड्स |
23 जुलै | भारत विरुद्ध इंग्लंड | दुपारी 3:30 | मँचेस्टर |
31 जुलै | भारत विरुद्ध इंग्लंड | दुपारी 3:30 | ओव्हल |
इंग्लंडचा हा दौरा भारतीय संघासाठी अनेक अर्थांनी खास असणार आहे. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे, यावेळी दौऱ्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नसण्याची शक्यता आहे आणि त्याच्या जागी एखाद्या नवीन खेळाडूला कर्णधारपद मिळू शकते. खरं तर, याआधी, टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली होती, जिथे त्यांना ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर रोहितच्या कर्णधारपदावर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते.