फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Aniket Verma’s batting : आयपीएल २०२५ चा १० वा सामना सुरु आहे, यामध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये लढत सुरु आहे. यामध्ये हैदराबादच्या संघाची अत्यंत खराब सुरुवात झाली आणि संघाने पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स गमावले आणि संघाचा आत्मविश्वास गमावला. पण हैदराबादच्या युवा २३ वर्षीय फलंदाजाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, सध्या त्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने फक्त ३० लाखांना खरेदी केलेला हा तरुण खेळाडू या सीझनमध्ये संघासाठी वरदान ठरत आहे. लखनौविरुद्ध १३ चेंडूत ३६ धावांची धमाकेदार खेळी करून खळबळ उडवणाऱ्या या फलंदाजाने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनाही चांगलेच झोडपले. ४१ चेंडूंच्या या खेळीत २३ वर्षीय फलंदाजाने ५ चौकार आणि सहा षटकार मारले. या फलंदाजाने ३७ धावांवर ४ विकेट गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या हैदराबादच्या डावाला वाचवलेच, तर त्याला सन्मानजनक धावसंख्येच्या उंबरठ्यावरही नेले. विशाखापट्टणममध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा तरुण फलंदाज म्हणजे अनिकेत वर्मा.
नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय संघाच्या विरोधात गेला. अभिषेक शर्मा फक्त एक धाव काढल्यानंतर धावबाद झाला, तर इशान किशन आणि नितीश रेड्डी यांना मिशेल स्टार्कने स्वस्तात बाद केले. ट्रॅव्हिस हेडही १२ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. ३७ धावांवर ४ विकेट गमावल्यानंतर हैदराबाद अडचणीत सापडले होते, परंतु अनिकेत वर्माने हेनरिक क्लासेनसह डाव उत्तम प्रकारे हाताळला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली.
Aniket Sharma put on a show to revive SRH with 74(41)
Watch his innings 📽️#TATAIPL | #DCvSRH | Watch 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
क्लासेन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर अनिकेतने जबाबदारी घेतली आणि दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसवला. स्फोटक फलंदाजी करताना अनिकेतने ४१ चेंडूत ७४ धावांची धमाकेदार खेळी केली आणि या लीगमधील त्याचे पहिले अर्धशतकही झळकावले. त्याच्या खेळीदरम्यान, २३ वर्षीय युवा फलंदाजाने ५ चौकार आणि ६ षटकार मारले. अनिकेतच्या खेळीमुळे हैदराबादने एकूण १६३ धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अनिकेत वर्माची बॅटही जोरात बोलली. अनिकेतने फक्त १३ चेंडूंचा सामना करत ३६ धावांची जलद खेळी केली. २७६ च्या स्ट्राईक रेटने खेळत या तरुण फलंदाजाने एकामागून एक पाच शक्तिशाली षटकार मारले. अनिकेतला मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ३० लाख रुपयांना खरेदी केले.