
Elite Sports Management : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा मुंबईत गौरव; 'हार्ट ऑफ गोल्ड' सोहळ्यात खेळाडूंच्या संघर्षाला सल
Elite Sports Management : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा मुंबईत गौरव करण्यात आला. एलिट स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीने ‘हार्ट ऑफ गोल्ड’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सहकार्याने परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यशाचा यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात विथ्या रामराज, गुरिंदरवीर सिंग, हरिता भद्रा आणि अस्लम इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. केवळ पदक विजय नव्हे, तर त्यामागील अनेक वर्षांची मेहनत, त्याग, जिद्द, आव्हाने आणि सांघिक भावना यांना या कार्यक्रमातून उजाळा देण्यात आला. क्रीडा सूत्रसंचालक जतिन सप्रू यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या प्रवासातील अनेक रंजक आणि प्रेरणादायी अनुभव जाणून घेतले.
या सोहळ्यात धावपटू विथ्या रामराजच्या कामगिरीची विशेष चर्चा झाली. तिने महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक, मिश्र 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकावले. तिने 54.75 सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीसह तिने पी. टी. उषा यांचा प्रदीर्घ काळ कायम असलेला विक्रम मागे टाकला.
गुरिंदरवीर सिंग आणि हरिता भद्रा यांनी मिश्र 4 बाय 100 मीटर रिले प्रकारात कांस्यपदक मिळवत सांघिक कामगिरीचा ठसा उमटवला. याशिवाय हरिताने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीतही कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी दाखवलेली जिद्द आणि संघभावनेचे यावेळी कौतुक करण्यात आले.
भारतीय पुरुष कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत अपराजित राहत सुवर्णपदक पटकावले होते. या विजयी संघाचा भाग असलेल्या अस्लम इनामदारचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दबावाच्या परिस्थितीतही संघाने दाखवलेली शिस्त, एकजूट आणि सातत्यपूर्ण कामगिरी भारतीय कबड्डीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी ठरली.
एलिट स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संस्थापक निशांत दयाल म्हणाले की, प्रत्येक पदकामागे खेळाडूंची अनेक वर्षांची मेहनत, शिस्त आणि त्याग असतो. त्यांच्या कुटुंबीयांचेही या यशात मोठे योगदान असते. त्यामुळे खेळाडूंच्या यशामागील व्यक्ती आणि त्यांच्या संघर्षाच्या कथा समोर आणण्यासाठी ‘हार्ट ऑफ गोल्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विथ्या रामराजनेही या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रत्येक शर्यत, अपयश आणि प्रशिक्षणातील मेहनतीमुळे सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास शक्य झाल्याचे तिने सांगितले. तर जतिन सप्रू यांनी खेळाडूंच्या यशामागील तयारी, मानसिकता आणि संघर्षाच्या कथा ऐकण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
एलिट स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या नेहा मोदी यांनी सांगितले की, गुणवत्तेला योग्य संधी मिळाली पाहिजे, या विश्वासातून संस्थेच्या फाउंडेशनद्वारे विशेषतः अॅथलेटिक्समधील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन आणि मदत देण्याचे काम केले जात आहे.
Ans: एलिट स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीने ‘हार्ट ऑफ गोल्ड’ या विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
Ans: मुंबईतील परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
Ans: विथ्या रामराज, गुरिंदरवीर सिंग, हरिता भद्रा आणि अस्लम इनामदार यांचा गौरव करण्यात आला.