फोटो सौजन्य - सोशल मीडिया
न्यूझीलंड आणि इंग्लंड : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर यजमान संघाला पराभवाचा धोका आहे. वास्तविक, न्यूझीलंडने दुसऱ्या डावात १५५ धावांवर ६ विकेट गमावल्या असून त्यांच्याकडे केवळ ४ धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी, किवी संघ ३४८ धावांवर ऑलआऊट झाला, याला प्रत्युत्तरात बेन स्टोक्सच्या संघाने ४९९ धावा केल्या आणि १५१ धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या चौथ्या दिवशी हा सामना लवकरात लवकर जिंकण्याकडे इंग्लंडचे लक्ष असेल. मात्र, डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये या विजयाचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये सध्या इंग्लंडचे ४०.७९ टक्के गुण आहेत आणि संघ सहाव्या स्थानावर आहे. जरी इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धचा हा कसोटी सामना जिंकला तरी त्यांच्या खात्यात केवळ ४३.७५ टक्के गुण जमा होतील आणि संघ सहाव्या स्थानावर राहील. कारण पाचव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ५४.१७ टक्के गुण आहेत.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनने इंग्लंडविरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा तो न्यूझीलंड क्रिकेट संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. ३४ वर्षीय विल्यमसनने १०३ कसोटी सामन्यांच्या १८२ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी विल्यमसनने १८० डावात ८८८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने क्राइस्टचर्च कसोटीच्या पहिल्या डावात ९३ धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात २६ धावा करत हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. इतकेच नाही तर सर्वात जलद ९००० कसोटी धावा पूर्ण करण्यात विल्यमसनने जो रूट आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे.
🚨 HISTORY BY KANE WILLIAMSON 🚨 – Williamson becomes the first New Zealand cricketer to complete 9000 runs in Tests 🫡 pic.twitter.com/Mj7xnOc2a9 — Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2024
९०० धावा करत विल्यमसनचे नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासाच्या पानात नोंदवले गेले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ १९वा फलंदाज आहे. एवढेच नाही तर या कामगिरीसह त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. किंबहुना, विल्यमसन सर्वात जलद ९००० धावा करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि पाकिस्तानचा युनूस खान या दिग्गज फलंदाजांची बरोबरी केली. दोघांनीही १०३ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.
न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विल्यमसनच्या नावावर आहे. त्याने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ५४ च्या सरासरीने ९००० हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात विल्यमसनने ३२ शतके झळकावली आणि ३५ अर्धशतकेही झळकावली.