
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया
The Ashes 2025-26 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये कांगारुच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे आघाडी आहे. पण या तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला इंग्लडने सडेतोड उत्तर देखील दिले यामध्ये योगदान हे बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचे होते. अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी अॅडलेडच्या मैदानावर खेळवली जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने उल्लेखनीय कामगिरी करत सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.
इंग्लंडच्या गोलंदाजांना धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियाने ३५६ धावांची आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडे दोन विकेट शिल्लक होत्या. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरची जोडी क्रीजवर होती. दोघांनीही लढाऊ खेळी केली आणि इंग्लंडकडून अर्धशतके झळकावली, परंतु संघ पहिल्या डावात फक्त २८६ धावाच करू शकला. पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाला ८५ धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली. यानंतर, ट्रॅव्हिस हेडच्या विक्रमी शतकाच्या जोरावर, संघ या सामन्यात पुढे जात असल्याचे दिसून येत आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी अॅडलेड कसोटीच्या पहिल्या डावात प्रभावी फलंदाजी केली. स्टोक्सने १९८ चेंडूत ८३ धावा केल्या, तर आर्चरने त्याला उत्तम साथ दिली. त्याने १०५ चेंडूत ५१ धावा केल्या, ज्यामुळे संघाला २८६ धावांचा सन्मानजनक आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची ताकद दिसली. खेळाच्या शेवटी तो १९६ चेंडूत १४२ धावांवर नाबाद राहिला. त्याच्यासोबत पहिल्या डावात शतक झळकावणारा अॅलेक्स कॅरी ९१ चेंडूत ५२ धावा करत होता. दोघांनी मिळून १२२ धावांची भागीदारी केली आहे.
The end of play scorecard on Day 3 in Adelaide. pic.twitter.com/3wdAY5nYdB — England Cricket (@englandcricket) December 19, 2025
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे अजूनही सहा विकेट्स शिल्लक आहेत आणि त्यांनी ३५६ धावांची आघाडी घेतली आहे. जर इंग्लंड संघाला हा सामना वाचवायचा असेल तर त्यांना त्यांच्या फलंदाजांकडून चमत्काराची आवश्यकता असेल. संघाने पहिले दोन कसोटी सामने आधीच गमावले आहेत आणि या सामन्यात पराभव झाल्यास मालिकाही गमावू शकते. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले.