मुंबई : जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचा आज 18 डिसेंबर रोजी समारोप होणार आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात एका बाजूला लिओनेल मेस्सीचा बलाढ्य अर्जेंटिना संघ असून दुसऱ्या बाजूला 2018 फिफा विश्वचषकाचा विजेता संघ फ्रान्स असणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघात विश्वविजेत्याचा खिताब पटकावण्याची अटीतटीची झुंज पाहायला मिळणार आहे. फ्रान्स हा FIFA विश्वचषक 2018 चा विजेता संघ असल्याने त्यांच्याकडे 60 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धा यंदा प्रथमच कतार येथे खेळवण्यात आली. फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत अनेक रोमांचक आणि स्पर्धेत उलटफेर करतील असे सामने पहायला मिळाले. 2018 चा चॅम्पियन संघ असणाऱ्या फ्रान्सने अंतिम फेरीत क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला होता. आता फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनणारा 60 वर्षांतील पहिला संघ बनण्याच्या जवळ आहे. तर दुसरीकडे मेस्सीचा अर्जेंटिना संघ फ्रान्सला विजेता होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल
कुठे पहाल सामना ?
कतार येथील लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार असून हे स्टेडियम अंतिम सामन्यासाठी सजवण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 च्या सुमारास या सामन्याला सुरुवात होणार आहे. FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना भारतातील Sports18 आणि Sports18 HD टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे तर चाहत्यांना लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema अॅप आणि वेबसाइटवर हा सामना विनामूल्य पाहता येईल.