
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आयपीएल 2026 साठी सर्वच उत्सुक आहेत, अनेक फ्रॅन्चायझींनी त्याची रिटेन लिस्ट जाहीर केली होती. 16 डिसेंबर रोजी आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे त्यासाठी क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. संघामध्ये अनेक नवे खेळाडू या नव्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे. कोलकता नाईट राइडर्सचा स्टार खेळाडू आंद्रे रसेल याला संघाने सोडल्यानंतर सर्वानाच धक्का बसला होता त्यानंतर त्याने निवृतीची घोषणा देखील केली आहे. आता तो केकेआरचा कोच म्हणून संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गज ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात सहभागी होणार नाही, अशी पुष्टी त्याने मंगळवारी केली. १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या मिनी-लिलावातून माघार घेणारा तो आंद्रे रसेल आणि फाफ डू प्लेसिसनंतर तिसरा मोठा खेळाडू आहे. फाफ आता आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळेल. अष्टपैलू मोईन खान देखील पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे. ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून आपला निर्णय जाहीर केला.
तो ३७ वर्षांचा आहे आणि बराच विचारविनिमय केल्यानंतर त्याने लिलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्याने आता आयपीएलला अलविदा म्हटले आहे. त्याने पुढे लिहिले, “आयपीएलने मला एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून घडवले आहे. मी भाग्यवान आहे की मला जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळायला मिळाले, एका उत्तम फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले आणि चाहत्यांसमोर अविश्वसनीय उत्साहाने कामगिरी केली. भारताच्या आठवणी, आव्हाने आणि ऊर्जा नेहमीच माझ्यासोबत राहील. गेल्या काही वर्षांत मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. लवकरच भेटण्याची आशा आहे. चिअर्स, मॅक्सी.”
त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलला शेवटचा पंजाब किंग्जने ४.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. हा स्टार अष्टपैलू खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये सात सामने खेळला पण त्याच्या प्रतिष्ठेनुसार खेळू शकला नाही. गेल्या हंगामात त्याने फक्त ४८ धावा काढल्या आणि फक्त चार विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलने १४१ आयपीएल सामन्यांमध्ये १८ अर्धशतकांसह २,८१९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४१ विकेट्सही आहेत.