Asia Cup 2025: आशिया कप 2025 ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई (UAE) सोबत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज आहे. तो फक्त 17 धावा करताच टी-20 आशिया कपमध्ये असा पराक्रम करेल जो यापूर्वी कोणत्याही खेळाडूने केलेला नाही.
टी-20 आशिया कपमध्ये आतापर्यंत हार्दिक पांड्याने 11 विकेट घेतल्या आहेत आणि 83 धावा केल्या आहेत. जर या आशिया कपमध्ये त्याने आणखी 17 धावा केल्या, तर तो टी-20 आशिया कपमध्ये 10 विकेट्स आणि 100 धावा करणारा पहिला खेळाडू बनेल. याआधी कोणत्याही खेळाडूला असा विक्रम करता आलेला नाही. त्यामुळे, आगामी स्पर्धेत 17 धावा करून तो ही खास कामगिरी आपल्या नावावर करू शकतो.
आशिया कपमध्ये हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. तो दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. दुबईतील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्यामुळे, कर्णधार सूर्यकुमार यादव दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांच्या संयोजनासह मैदानात उतरू शकतो.
पाकिस्तानसोबत 14 सप्टेंबरला होणार महामुकाबला
यूएई विरुद्धच्या सामन्यांनंतर टीम इंडियाचा पुढील सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होईल. त्यानंतर 19 सप्टेंबरला भारतीय संघ ओमानशी खेळेल. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. जर टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन सामने जिंकले, तर ते सहजपणे सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. आगामी आशिया कपमध्ये भारतीय संघाला ‘ग्रुप ए’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. आता या स्पर्धेत टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.