फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हरमनप्रीत कौर : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघाची नुकतीच T२० मालिका झाली यामध्ये भारताच्या संघाने २-१ अशी मालिका नावावर केली. आता कालपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला यामध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला २११ धावांनी पराभूत केलं. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४ धावा करत इतिहास रचला. वनडेमध्ये कर्णधार म्हणून १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती १०वी भारतीय फलंदाज ठरली आहे. हरमनप्रीत कौरच्या आधी एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि कपिल देव यांनी पुरुष क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे.
IND vs WI : कॅप्टन हरमनच्या कॅच जिंकली चाहत्यांची मनं, सोशल मीडियावर व्हिव्हिओ व्हायरल
याशिवाय हे विशेष यश मिळवणारी ती दुसरी भारतीय महिला कर्णधार ठरली आहे. हरमनप्रीत कौरच्या आधी अनुभवी मिताली राजने ही कामगिरी केली होती. हरमनप्रीतने वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ही कामगिरी केली. भारतीय कर्णधाराने २६ सामन्यात ५३.२६ च्या सरासरीने १०१२ धावा केल्या आहेत ज्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यात सप्टेंबर २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद १४३ धावांचाही समावेश आहे.
एमएस धोनी – 200 सामन्यात 6641 धावा
विराट कोहली – 95 सामन्यात 5449 धावा
मिताली राज – 155 सामन्यात 5319 धावा
मोहम्मद अझरुद्दीन – 174 सामन्यात 5239 धावा
सौरव गांगुली – 146 सामन्यात 5082 धावा
राहुल द्रविड – 79 सामन्यात 2658 धावा
सचिन तेंडुलकर – 73 सामन्यात 2454 धावा
रोहित शर्मा – 48 सामन्यात 2204 धावा
कपिल देव – 74 सामन्यात 1564 धावा
हरमनप्रीत कौर – 26 सामन्यात 1012 धावा
कर्णधार हरमनप्रीत कौर T20 मालिकेदरम्यान जखमी झाली होती. यामुळे ती शेवटचे दोन सामने खेळू शकली नाही. हरमनप्रीतच्या जागी स्मृती मंधानाने संघाची कमान सांभाळली. मात्र, वनडे मालिकेपूर्वी ती पूर्णपणे तंदुरुस्त झाली आणि तिने संघासाठी ३४ धावा केल्या. यादरम्यान हरमनप्रीत कौरने २३ चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिला वनडे २११ धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १०३ धावांवर गारद झाला. रेणुका सिंग ठाकूरने पाच विकेट घेतल्या. प्रिया मिश्राने दोन गडी बाद केले.
भारताच्या महिला संघाचा दुसरा सामना २४ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याच्याकडे आता मालिकेमध्ये १-० अशी आघाडी आहे. आता भारतीय क्रिकेट चाहत्याची नजर दुसऱ्या सामन्यावर असणार आहे.