भारत विरूद्ध इंग्लंडचा 5 वा कसोटी सामना रंगणार 31 जुलैला (फोटो सौजन्य - Instagram)
अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील चौथी कसोटी खूपच रोमांचक होती, जी अखेर अनिर्णित राहिली. दोन्ही देश ३१ जुलैपासून पाचवी कसोटी खेळणार आहेत, त्याआधी भारतीय संघाने लंडनमधील ‘भारतीय उच्चायोग’ला भेट दिली. या दरम्यान, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अधिकारी आणि मान्यवरांना भेटले, ज्यामध्ये आत्मपरीक्षण, अभिमान आणि दृढनिश्चयाची भावना दिसून आली. UK दौऱ्यादरम्यान मिळालेल्या अढळ पाठिंब्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांनीही शेवटच्या कसोटीबद्दल विधान केले. त्यांनी सांगितले की, संघाकडे देशाला अभिमान वाटावा अशी शेवटची संधी आहे.
इंग्लंड दौऱ्याबाबत काय बोलला गंभीर?
या कार्यक्रमात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने भारत-इंग्लंड सामन्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि मालिकेची तीव्रता यावर प्रकाश टाकला. गंभीर म्हणाले, “इंग्लंडचा दौरा नेहमीच रोमांचक आणि आव्हानात्मक राहिला आहे. दोन्ही देशांमधील इतिहास कधीही विसरता येणार नाही. आम्ही ब्रिटन दौऱ्यावर असताना आम्हाला मिळालेल्या पाठिंब्याचे आम्ही कौतुक करतो.”
इंग्लंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना पाच विकेट्सने जिंकला, त्यानंतर टीम इंडियाने प्रत्युत्तर देत दुसरा सामना ३३६ धावांनी जिंकला. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना २२ धावांच्या जवळच्या फरकाने जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली, त्यानंतर चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
शेवटच्या कसोटीसाठी भारताचा हुंकार
गौतम गंभीर यावेळी म्हणाला की, “गेले पाच आठवडे दोन्ही देशांसाठी खूप रोमांचक राहिले आहेत. ज्या प्रकारच्या क्रिकेट खेळल्या गेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अभिमान वाटतो. दोन्ही संघांनी दमदार खेळ केला.”
भारताला शेवटची कसोटी जिंकून मालिका २-२ अशी संपवण्याची संधी आहे. गंभीरने शेवटच्या कसोटीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, “आपल्याकडे आणखी एक आठवडा आहे. आपल्याला एक शेवटचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी ही शेवटची संधी आहे. जय हिंद.” गंभीरच्या विधानावरून हे स्पष्ट होते की ओव्हलवर होणारा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्वतोपरी प्रयत्न करेल.
केनिंग्टन ओव्हलवर भारताचा रेकॉर्ड कसा आहे?
भारताने या मैदानावर एकूण १५ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी फक्त दोन सामने जिंकले. केनिंग्टन ओव्हलवर सहा कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, तर सात सामने अनिर्णित राहिले. २०२१ पासून भारताने या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही. गेल्या १० कसोटी सामन्यांपैकी त्यांनी फक्त एकच सामना जिंकला आहे. ऑगस्ट १९७१ मध्ये भारताला या मैदानावर पहिला कसोटी विजय मिळाला. सप्टेंबर २०२१ मध्ये भारताने येथे दुसरा विजय नोंदवला आणि १५७ धावांनी सामना जिंकला.