रवींद्र जडेजा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG, 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी सर्वांना प्रभावित केले. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या ३३१ धावांच्या आघाडीला पार करून भारताने सामना ड्रॉ केला. यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शानदार शतकं झळकावली. या शतकांच्या जोरावर भारताने या सामन्यात आपला पराभव टाळला आणि सामनाड्रॉ करण्यात यश मिळवलं. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने खास कामगिरी केली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी रवींद्र जाडेजाने खास पराक्रम केला आहे, जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कपिल देव, विनू मांकड किंवा अन्य कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला जमलेला नाही. रवींद्र जडेजा आता परदेशी भूमीवर एकाच देशात किमान १००० धावा आणि ३० विकेट घेणारा क्रिकेट इतिहासातील केवळ तिसराच अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
या खास विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिजचे माजी महान अष्टपैलू गॅरी सोबर्स सर्वात अव्वल स्थानावर विराजमान आहेत. सोबर्स यांनी इंग्लंडच्या भूमीवर 1820 धावा फटकावल्या असून 62 विकेट घेण्याची किमया केली आहे. सोबर्स यांनी ही कामगिरी इंग्लंडविरुद्धच केली आहे. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचे विलफ्रेड रोड्स हे आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. रोड्स यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली आहे. रोड्स यांच्या खात्यात ऑस्ट्रेलियामध्ये 1032 धावा आणि 42 विकेट जमा आहेत.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, इंग्लडच्या संघामध्ये होणार या गोलंदाजाची एन्ट्री!
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आता केवळ ओव्हल कसोटी सामनाच बाकी आहे. तसेच जाडेजाचे पुढच्या वेळी त्याचे इंग्लंड दौऱ्यावर येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा विक्रम मोडणे त्याच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.