फोटो सौजन्य – X (BCCI & PTI)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. आठ वर्षांनी टीम इंडियामध्ये परतलेल्या करुण नायरला इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये तो वाईटरित्या अपयशी ठरला. परिणामी चौथ्या कसोटी सामन्यात नायरला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले नाही. पहिल्या तीन सामन्यामध्ये करुण नायर याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली पण तो आतापर्यत एकही अर्धशतक झळकावु शकला नाही. यावर आता भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक नायरला संघामधुन का वगळण्यात आले आहे यासंदर्भात सविस्तर सांगितले आहे.
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून नायरला वगळण्यात आले आणि साई सुदर्शनला संधी देण्यात आली. या डावखुऱ्या फलंदाजाने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. तथापि, दुसऱ्या डावात तो आपले खातेही उघडू शकला नाही आणि बाद झाला. शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, कोटक यांनी नायरला संघातून का वगळण्यात आले याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात की संघ व्यवस्थापन नायरला दबावापासून मुक्त ठेवू इच्छिते.
कोटक म्हणाले, “भारतीय संघाच्या प्लेइंग-११ संघामध्ये कोण खेळणार याची निवड गौतम गंभीर आणि शुभमन गिल हे खेळाडूंची निवड करतात. जरी मी निवड गटाचा भाग असलो तरी, मला वाटत नाही की येथे यावर चर्चा करावी. त्यांनी म्हटले होते की आम्ही नायरला पाठिंबा देऊ. या मालिकेतील त्याच्या कामगिरीकडे पाहिले तर त्याने वाईट फलंदाजी केलेली नाही. त्याने नेहमीच चांगली सुरुवात केली आहे.
अनेक वेळा संघ व्यवस्थापनाला वाटते की नायरवरील दबाव वाढत आहे आणि चौथ्या कसोटीत तो आणखी वाढू शकतो. ते असे बदल करू शकतात. याचा अर्थ असा नाही की संघ व्यवस्थापन त्याला पाठिंबा देत नाही.” या मालिकेतील सहा डावांमध्ये नायरने १३१ धावा केल्या आहेत ज्यात त्याचा सर्वोत्तम स्कोअर ४० धावा आहे. तो त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही आणि दबावाखाली चुकीचा शॉट खेळून अनेकदा बाद झाला.
आता हे पाहणे बाकी आहे की नायर आगामी सामन्यांमध्ये किंवा मालिकेत टीम इंडियाचा भाग बनू शकतो की नाही. २०१६ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात नायरने शतक झळकावले. हे त्याचे पहिले कसोटी शतक होते जे त्याला त्रिशतकात रूपांतरित करण्यात यश आले. तथापि, त्यानंतर तो पुन्हा अशी खेळी खेळू शकला नाही आणि त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण धावांमुळे, त्याने आठ वर्षांनी पुनरागमन केले जे अपयशी ठरले.