भारतीय खेळाडूांपैकी ३ खेळाडू ज्यांनी जिंकले मन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत असली तरी, भारताला चार कसोटी जिंकण्याची संधी होती. इंग्लंडने शेवटी दोन सामने कसेबसे जिंकण्यात यश मिळवले. या दौऱ्यावर गेलेल्या संघातील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. तरुण संघाकडून कोणालाही फारशा अपेक्षा नव्हत्या.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २५ वर्षीय शुभमन गिलवर ही जबाबदारी आली होती आणि कोणत्याही व्यक्तीला या संघाकडून अपेक्षा नव्हती. मात्र ५ कसोटी सामन्यांमधून भारतीय संंघाने इतकी उत्कृष्ट कामगिरी केली की हरलेल्या मॅचमधूनही भारताची वाहवा झाली. यामध्ये असे ३ खेळाडू अधिक गाजले ज्यांच्या नावाची ना चर्चा होती ना त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा होती. कोणते आहेत हे खेळाडू आपण जाणून घेऊया आणि त्यांनी कशा पद्धतीने संपूर्ण जगाचे मन जिंकले? (फोटो सौजन्य – Instagram)
वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी
या कसोटी मालिकेत वॉशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी केली. सुंदरने फलंदाजीने चांगली कामगिरी केली. सुंदरने ४ कसोटी सामने खेळले आणि २८७ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून १ शतक आणि १ अर्धशतक झळकले. याशिवाय त्याने ७ विकेट्सही घेतल्या. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही बाजूला त्याने भारतीय संघाला चांगला आधार दिल्याचे दिसले. इतकंच नाही तर बॅटिंग करताना आपण उत्तम बॅट्समन आहोत हेदेखील त्याने सिद्ध केले आणि गरजेच्या वेळी उत्तम कामगिरी करत सर्वांचे मन जिंकले.
Asia Cup 2025 India: आशिया कपसाठी भारतीय टीमची लवकरच घोषणा, शुभमन, यशस्वी आणि साई सुदर्शनला संधी?
प्रसिद्ध कृष्णा
प्रसिद्ध कृष्णाची कमालीची गोलंदाजी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानेही अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्याकडून इतक्या चांगल्या कामगिरीची कोणालाही अपेक्षा नव्हती कारण तो आतापर्यंत जास्त कसोटी खेळलेला नाही. ओव्हल कसोटीत कृष्णाने ८ विकेट्स घेतल्या. संपूर्ण मालिकेत त्याने ३ सामने खेळले आहेत आणि १४ विकेट्स घेतल्या आहेत. सिराजच्या खांद्याला खांदा लाऊन प्रसिद्ध कृष्णा उभा राहिला आणि मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे दिसून आले. या कसोटीमध्ये त्याचे नाव घेतले नाही तर नक्कीच चुकीचे ठरेल.
रविंद्र जडेजा
‘सर’ रविंद्र जडेजाची कमाल
‘सर’ जडेजा म्हणून ओळख असणारा हा अवलिया भारताला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा एखाद्या चिलखतासारखा उभा राहिला आहे. या मालिकेत रवींद्र जडेजाने फलंदाजीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. जडेजाने ५ सामन्यात ५१६ धावा केल्या. तसेच त्याने ५ अर्धशतके आणि १ शतकही केले. संपूर्ण मालिकेत जडेजाने एकूण ७ बळी घेतले. कोणत्याही कसोटी सामान्यात त्याने संघाला आणि चाहत्यांना निराश केले नाही. अगदी लॉर्ड्स कसोटीतही तो शेवटपर्यंत लढत राहिला, ही कसोटी कायमस्वरूपी चाहत्यांच्या लक्षात राहील.
एकंदरीच या तिन्ही खेळाडूंनी आपला स्वतःचा एक दबदबा या सिरीजमध्ये निर्माण केला आहे आणि चाहत्यांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अतिशयोक्तीही ठरणार नाही.
IND Vs ENG Test Series: ‘या’ ५ कारणांमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध खेचून आणला दणदणीत विजय