IND VS ENG: Virat Kohli's entry in Lord's Test? 'That' one decision raised the hopes of the fans..
IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव केला आहे. आता या संघातील तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळवण्यात येणार आहे. अशातच भारतीय दिग्गज क्रिकेटर विराट कोहली सध्या त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासह लंडनमध्येया आहेत. या दोघांची जोरदार चर्चा होत आहे. अलिकडेच हे पॉवर कपल विम्बल्डन २०२५ चा एक हाय-प्रोफाइल टेनिस सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. या सामन्यात विराटकडून टेनिस दिग्गज नोवाक जोकोविचला पाठिंबा देण्यात आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट-अनुष्का लंडनमधील सेंट जॉन्स वुड परिसरात राहत असल्याची माहिती आहे. त्याच वेळी, विम्बल्डन सामने लंडनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोकेट क्लबमध्ये खेळवले जात असून येथून विराट कोहलीचे घर जवळ आहे. ज्यामुळे तो सामना पाहण्यासाठी येथे पोहचला होता. अशा परिस्थितीत, आता तो टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळून झाले असून यामध्ये दोन्ही संघाने १-१ अशी बरोबरी साधली आहे. आगामी तिसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. हे मैदान देखील सेंट जॉन्स वुडमध्ये आहे, जे कोहलीच्या तात्पुरत्या निवासस्थानापासून काही अंतरावर आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना अपेक्षा आहे की, विराट कोहली भारतीय संघातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊ शकतो. जर कोहली लॉर्ड्सवर दिसून आला तर भारतीय संघातील खेळाडूंसह चाहत्यांसाठी देखील हा आनंदाचा क्षण असणार आहे.
विराट कोहलीकडून विम्बल्डन २०२५ दरम्यान स्टार स्पोर्ट्ससोबत संवाद साधण्यात आला आहे. यावेळी, कोहली म्हणाला की, त्याचा स्वप्नातील अंतिम सामना हा जोकोविच आणि स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराज यांच्यात होणार. पुढे तो म्हणाला की, “मला कार्लोस अल्काराज आणि नोवाकने अंतिम फेरीत पोहोचावे आणि नोवाकने विजेतेपद जिंकावे अशी माझी इच्छा आहे, कारण त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर ते त्याच्यासाठी जबरदस्त असणार आहे.”
विराट कोहली पुढे म्हणाला की, “वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळी आव्हाने येत असतात. क्रिकेटमधील एक आव्हान म्हणजे तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, तुम्ही सकाळी वॉर्म अप करत असतात नंतर परत येऊन ड्रेसिंग रूममध्ये वाट पाहत असतात, कारण तुम्हाला माहित नसते की तुम्ही कधी फलंदाजी करण्यासाठी जाणार. टेनिसमध्ये, कदाचित तुमच्याकडे निश्चितया अशी परिस्थिती असते, तुम्हाला याबाबत माहिती असते की तुम्ही काय करत आहात.”