
IND vs NZ: India's statistics in Rajkot are worrying! New Zealand could gain the upper hand; read in detail.
How has the Indian team performed in Rajkot? : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता, भारतीय संघ हा सामना जिंकून एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. परंतु, इथे विजय मिळवणे भारतासाठी सोपे असणार नाही. कारण, राजकोटमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे? वाचा सविस्तर
भारतीय संघाने आतापर्यंत, राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर चार एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध या स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. इंग्लंडने या सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला होता. २०१५ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना १८ धावांनी गमावला होता.
२०२० मध्ये, भारताने ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता आणि हा सामना ३६ धावांनी जिंकला होता. भारतीय संघाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यात त्यांना ६६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. चार सामन्यांमधील तीन पराभव भारतीय संघाच्या चिंतेत भर घालत आहेत. तिन्ही वेळा, भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरला आहे. तर एकमेव सामना प्रथम फलंदाजी करताना आपल्या खिशात घातला होता.
केन विल्यमसन, मॅट हेन्री आणि मिशेल सँटनर सारख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला चांगली लढत दिली. परंतु, त्यांना सामना जिंकता आला नव्हता. विराट कोहलीची फलंदाजी आणि किवीज संघाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे सामना भारताच्या पारड्यात पडला. त्यामुळे, राजकोटमध्ये भारताला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत देखील न्यूझीलंडकडे पुनरागमन करण्याची चांगली क्षमता आहे.
पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला संघाबाहेर जावे लागले आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी आयुष बदोनीला संघात स्थान दिले आहे. सुंदरचा आगामी टी२० विश्वचषक संघात समावेश आहे. तो फक्त या मालिकेतून बाहेर पडतो की विश्वचषकातूनही बाहेर पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.