
दुबईत भारताचा तिरंगा फडकला! शेवगावचा सुपुत्र हर्षल घुगे ठरला विश्वविजेता (Photo Credit - X)
सुरुवातीपासूनच भारताचा दबदबा
या स्पर्धेत भारतीय संघ सुरुवातीपासूनच अजिंक्य राहिला. साखळी फेरीत भारताने सौदी अरेबियाचा १६-१ आणि ब्राझीलचा ११-२ असा धुव्वा उडवला. या दोन्ही सामन्यांत हर्षलने आपली छाप सोडली. सौदी अरेबियाविरुद्ध त्याने ४, तर ब्राझीलविरुद्ध ३ गोल नोंदवले. या कामगिरीमुळे भारताने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला.
बाद फेरीतही ‘हर्षल’ पर्व
बाद फेरीतील चुरशीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १७-५ असा धुव्वा उडवला. या सामन्यातही हर्षलने २ गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर उपांत्य फेरीत इजिप्तवर ६-२ अशी मात करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली.
थरारक अंतिम सामना
अंतिम सामन्यात भारत आणि केनिया यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हर्षल घुगेने आपल्या अनुभवाचे प्रदर्शन करत ३ महत्त्वाचे गोल केले. हर्षलच्या या कामगिरीमुळे भारताला ११-१० असा विजय मिळवता आला आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले.
स्वप्नपूर्ती झाली!
हर्षल घुगे आपल्या भावना वक्त करत म्हणाला, “देशासाठी विश्वचषक जिंकणे हे माझे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले आहे. हा विजय माझ्या कुटुंबाला, प्रशिक्षकांना आणि मला पाठबळ देणाऱ्या प्राप्तिकर विभागाला समर्पित करतो. महाराष्ट्र रोल बॉल संघटना आणि भारतीय रोल बॉल फेडरेशनने दिलेल्या संधीबद्दल मी ऋणी आहे.”
शेवगाव ते दुबई: एक प्रेरणादायी प्रवास
२००८ पासून रोल बॉल खेळणाऱ्या हर्षलने आतापर्यंत १० पेक्षा जास्त वेळा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या याच खेळाची दखल घेत जुलै २०२४ मध्ये त्याची मुंबई प्राप्तिकर विभागात ‘स्पोर्ट्स कोटा’अंतर्गत साहाय्यक पदी नियुक्ती झाली. एका छोट्या गावातून येत जागतिक स्तरावर झेंडा फडकवणाऱ्या हर्षलच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे नाव जगात उंचावले आहे.