फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृती घेतली आहे. तो आता फक्त सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसत आहे. आता तो आगामी मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे. तो सध्या मागील काही मालिकांमध्ये कमालीच्या फार्ममध्ये पाहायला मिळाला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज रोहित शर्माने रविवारी (२१ डिसेंबर) इंग्लंड संघावर टीका केली. त्याच्या मते, ऑस्ट्रेलियात खेळणे सर्वात कठीण आहे आणि तुम्ही त्याबद्दल इंग्लंडला विचारू शकता.
इंग्लंडचा संघ सध्या २०२५-२६ च्या अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला सलग तीन पराभव पत्करावे लागले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियात अॅशेस जिंकण्याच्या त्यांच्या आशा अवघ्या ११ दिवसांत संपुष्टात आल्या. इंग्लंडने पर्थ आणि ब्रिस्बेनमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यात तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत प्रत्येकी ८ विकेट्सने पराभव पत्करला आणि रविवारी दुपारी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना ८२ धावांनी पराभूत केले.
रविवारी दुपारी गुरुग्राममध्ये रोहित एका कार्यक्रमात उपस्थित होता, जिथे त्याने प्रेक्षकांना सांगितले, “ऑस्ट्रेलियामध्ये खेळणे सर्वात कठीण असते, तुम्ही इंग्लंडला विचारू शकता.” रोहितने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला. सहा वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध १००० एकदिवसीय धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. तथापि, ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केलेली नाही.
Rohit Sharma said : “Playing in Australia is the most difficult you can ask England about it.” 😭😂🔥 bRO just owned England and @TheBarmyArmy 🤣😆🙏 pic.twitter.com/qvXQWMQNe3 — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) December 21, 2025
नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या निरोप मालिकेत कसोटी पदार्पण केल्यापासून, रोहितने ऑस्ट्रेलियात १० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये १९ डावांमध्ये फक्त ४३९ धावा केल्या आहेत. त्याने तीन कसोटी अर्धशतके केली आणि एकदा तो शून्यावर बाद झाला. त्याच्या शेवटच्या कसोटी मालिकेत, रोहितने ऑस्ट्रेलियात तीन कसोटी सामने खेळले परंतु पाच डावांमध्ये त्याला फक्त ३१ धावा करता आल्या.
सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली जाईल. ऑस्ट्रेलियाने आधीच मालिका जिंकली आहे, परंतु बेन स्टोक्सच्या संघाला पुन्हा एकदा हरवून ते ४-० अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स आणि नाथन लायनशिवाय खेळू शकते. लायन दुखापतग्रस्त आहे आणि कमिन्सला विश्रांती दिली जाऊ शकते.






