
IPL 2026: KKR's big innings before the auction! 'This' veteran appointed as assistant coach
Shane Watson appointed as KKR assistant coach : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामाची चाहूल लागली असून या हंगामसाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. अशातच आता तीन वेळा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ च्या लिलावपूर्वी मोठी खेळी केली आहे. केकेआरने आपल्या संघांच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसनची नियुक्ती केली आहे. वॉटसनने यापूर्वी आयपीएल २०२२ आणि २०२३ च्या हंगामात रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्ससाठी सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. आता तो अभिषेक नायर आणि मार्गदर्शक ड्वेन ब्राव्हो यांच्या नेतृत्वाखालील नवीन केकेआर कोचिंग युनिटमध्ये सामील होणार आहे.
हेही वाचा : अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन जोडीची क्लिप व्हायरल! न्यूयॉर्कमध्ये दिसले एकत्र; लग्नाच्या अफवांना बळ
त्यांचे पहिले काम हे १५ नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी केकेआरच्या खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत सूचना देणे आणि डिसेंबरच्या मध्यात अबू धाबीमध्ये होणाऱ्या मिनी लिलावाची तयारी करणे हे असणार आहे.
याबाबत बोलताना वॉटसनने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “कोलकाता नाईट रायडर्ससारख्या प्रतिष्ठित फ्रँचायझीचा भाग असणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. केकेआर चाहत्यांच्या उत्साहाचे आणि उत्कृष्टतेसाठी संघाच्या वचनबद्धतेचे मी नेहमीच कौतुक केले आहे. कोलकात्याला आणखी एक विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी प्रशिक्षक गट आणि खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”
खेळातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या वॉटसनने ५९ कसोटी, १९० एकदिवसीय आणि ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सर्व फॉरमॅटमध्ये १०,००० हून अधिक धावा केल्या आणि २८० हून अधिक विकेट्स चटकावल्या आहेत.
२००७ आणि २०१५ मध्ये दोन वेळा पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या वॉटसनमध्ये बॅट आणि बॉलने सामने वळवण्याची क्षमता होती. वॉटसनने २००८ ते २०२० दरम्यान १४५ सामने खेळून आयपीएल हंगामात देखील उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने स्पर्धेत चार शतके झळकावली आहेत आणि राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह जेतेपद देखील जिंकले आहे. २००८ आणि २०१३ च्या हंगामात तो सर्वात मौल्यवान खेळाडू देखील राहिला आहे.
हेही वाचा : Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले की, “केकेआर कुटुंबात शेन वॉटसनचे स्वागत करण्यास आम्हाला खूप आनंद होत असून खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्याचा अनुभव आमच्या संघ संस्कृती आणि तयारीमध्ये मोठे योगदान देईल. टी२० स्वरूपाची त्याची समज जागतिक दर्जाची आहे आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील आम्ही त्याच्या योगदानाची अपेक्षा करत आहोत.” असे देखील वेंकी म्हैसूर म्हणाले.