LSG vs SRH : आयपीएल २०२५ चा ६१ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा नसला तरी लखनौसाठी हा सामना करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. हा सामना जिंकूनच लखनौ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवू शकणार आहे. अन्यथा आयपीएल 2025 मधील गाशा गुंडळावा लागेल.
खरंतर, हैदराबाद याआधीच आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण लखनौच्या आशा अद्यापही जिवंत आहेत. अशा परिस्थितीत, आज हैदराबाद लखनौचा सामना बिघडवू शकते किंवा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी शानदार खेळ करून विजयश्री खेचून आणू शकतो. जाणून घेऊया सामन्याशी संबंधित काही महत्वाची माहिती.
पिच रिपोर्ट
लखनौचे एकाना स्टेडियम हे उच्च धावसंख्या असलेले मैदान मानले जात नाही, परंतु काही प्रसंगी येथे बऱ्याच वेळा धावांचा पाऊस देखील पडला आहे. गेल्या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना केवळ १५९ धावाच केल्या होत्या, ज्या दिल्ली कॅपिटल्सने १८ व्या षटकात सहज पूर्ण केल्या होत्या. अशा परिस्थितीत, या मैदानावर प्रथम गोलंदाजी करणे ही एक चांगली रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
सोमवारी संध्याकाळी लखनौमधील हवामान क्रिकेट प्रेमींसाठी उत्तम असणार आहे. तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस राहील आणि हवेतील आर्द्रता ४०% असणार आहे. पावसाची शक्यता खूपच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता जवळजवळ शून्य वर्तवण्यात येत आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. जिथे हैदराबादचे वर्चस्व दिसून आले. तर लखनौला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. आज एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौसाठी हा आकडा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी/जयदेव उनाडकट.
लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई.