National Sports Administration and Anti-Doping Bill passed in Lok Sabha; Know complete information about the bill..
दिल्ली : आज म्हणजेच सोमवार, ११ ऑगस्ट रोजी लोकसभेत क्रीडाशी संबंधित दोन महत्वपूर्ण विधेयके मंजूर केली गेली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक यांचा समावेश आहे. दोन्ही विधेयके केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मडविया यांनी लोकसभेत मांडली होती. त्यानंतर दोन्ही विधेयके बहुमताने मंजूर करण्यात आली.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया विधेयकालाबाबत म्हणाले की, हे कायदे भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ते म्हणाले की, जेव्हा भारत ऑलिंपिकच्या आयोजनाचा दावा करेल तेव्हा आपली क्रीडा व्यवस्था मजबूत असणे महत्त्वाचे असणार आहे. हे विधेयक त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ हे भारतातील क्रीडा पारदर्शक, जबाबदार आणि खेळाडूंच्या हिताकडे लक्ष केंद्रित करण्यासाठीचे उद्दिष्ट समोर ठेवते. या विधेयकाद्वारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळसारख्या देशातील क्रीडा संघटनांचे कामकाज सुधारण्यास मदत होईल. या संघटना पारदर्शक पद्धतीने चालवण्यात येतील आणि त्यांच्या निर्णयांसाठी जनता आणि सरकारला जबाबदार असेल याची खात्री करण्यात येईल.
महिला आणि अल्पवयीन खेळाडूंच्या हक्कांना आणि संरक्षणाला प्राधान्यक्रम देण्यात येईल. विशेषतः त्यांना सुरक्षित आणि सहाय्यक वातावरण मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच, क्रीडा संघटनांमध्ये निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका घेण्यात येतील, ज्यामुळे कोणताही गटबाजी किंवा पक्षपात होणार नाही याची काळजी घेतली जाईल. याशिवाय, खेळांशी संबंधित असणाऱ्या वादांवर जलद आणि प्रभावी तोडगा काढण्यासाठी एका मजबूत व्यवस्थेची निर्मिती केली जाईल, जेणेकरून खेळाडूंना वेळेवर न्याय मिळण्यास मदत होईल.
राष्ट्रीय अँटी-डोपिंग (सुधारणा) विधेयक २०२५ चा उद्देश हा भारतातील खेळांना डोपिंगमुक्त करणे आणि खेळाडूंच्या हक्कांचे संरक्षण करणे असणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लागू करण्यात येईल. २०२२ नंतर, हे जुने डोपिंग कायदा बदलवून ते जागतिक अँटी-डोपिंग एजन्सी (वाडा) च्या आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करणार आहे. या नवीन कायद्यात, डोपिंगशी संबंधित व्याख्या अधिक स्पष्ट आणि तपशीलवार करण्यात आल्या आहेत. एकूणच हे विधेयक भारताच्या डोपिंग नियंत्रण यंत्रणेला बळकटी प्रदान करून खेळाडूंना एक निष्पक्ष, सुरक्षित आणि आदरयुक्त क्रीडा वातावरण निर्माण करेल.