Maharashtra's shock win in Khelo India Youth Championship! Third consecutive victory; Sports Minister Dattatreya Bharne congratulates the winners
मुंबई दि १६ : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी ठरलेल्या विजेत्या खेळाडूंचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.
बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.
ही कामगिरी म्हणजे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघटनांचे योगदान आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित आहे. राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंद केले. फडणवीस म्हणाले की, ‘भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकचा पराक्रम रचणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केली आहे. यामुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने ताठ झाली आहे. खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रम देखील नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.