भारताकडून या सामन्यात पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात पंतने सलग शतक लगावले तसेच राहुलने देखील शतक झळकावले. ५ शतके ठोकल्यानंतर देखील पराभव पत्करणारा भारत पहिला देश ठरला आहे. याआधी १९२८-२९ मध्ये, ऑस्ट्रेलियन संघाने चार शतके ठोकूनही एमसीजीवर कसोटी सामना गमावला होता.
भारताने या सामन्याच्या पहिल्या डावात ४७१ धावा उभारल्या होत्या. हार पत्करलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात हा भारताचा सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी, १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात ४२४ धावा केल्यानंतरही संघाला पराभवाला सामोरे लागले होते.
भारताने पहिल्या डावात ४७१ आणि दुसऱ्या डावात ३५४ धावा केल्या. टीम इंडियाने सामन्यात एकूण ८३५ धावा उभारल्या. गमावलेल्या कसोटीत भारताचा ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये, अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७५९ धावा करून देखील संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने चौथ्या डावात १७० चेंडूत १४९ धावा केल्या. त्यात त्याने २१ चौकार आणि १ सिक्स मारला. कसोटी इतिहासातील चौथ्या डावात भारताविरुद्ध ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी, जो रूटने २०२२ मध्ये बर्मिंगहॅममध्ये १४२ धावांची नाबाद खेळी साकारली होती.
इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात ३७१ धावा करून विजय मिळवला. कसोटीत भारताविरुद्धचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग आहे. यापूर्वी, २०२२ मध्ये भारताविरुद्ध इंग्लंडने बर्मिंगहॅममध्ये ३७८ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून गाठले होते.