मुंबई : आज आयपीएल २०२२ चा शेवटचा आणि फायनल सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या महामुकाबल्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरातने लॉकी फर्ग्युसनला पुन्हा संघात घेतले असून अल्झारी जोसेफला बेंचवर बसवले आहे. राजस्थानने मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे. या मोसमात दोन्ही संघांनी शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवल्यानंतर गुजरातने क्वालिफायर १ मध्ये राजस्थानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि प्रत्येकाला एका शानदार सामन्याची अपेक्षा आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा प्रवास कोणत्याही संघासाठी स्वप्नवत ठरू शकतो. पहिला हंगाम खेळणाऱ्या या संघाने मोठ्या अनुभवी संघांना मागे टाकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो संघाच्या एकत्रित कामगिरीचा. कधी हार्दिक पंड्याने स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेतली, तर कधी डेव्हिड मिलरने अनुभव वापरून सामना जिंकला. राहुल तेवतिया आणि राशिद खान यांचे योगदानही वाखाणण्याजोगे आहे.
[read_also content=”अमरावतीत रॅली काढल्याप्रकरणी राणा दांपत्यावर गुन्हा दाखल; रवी राणा नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/rana-couple-charged-in-amravati-rally-what-exactly-did-ravi-rana-say-read-detailed-nrdm-286268.html”]
आयपीएल २००८मध्ये फायनल जिंकून राजस्थान रॉयल्सने आता लीगच्या इतिहासात दुस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघासाठी अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली, तरी फलंदाजीत जोस बटलरचे, तर गोलंदाजीत लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे मोठे योगदान आहे. या दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले. बटलरने क्वालिफायर १ मध्ये अर्धशतक झळकावले होते. त्याने क्वालिफायर २ मध्येही नाबाद शतक झळकावले. गेल्या सामन्यात चहलला विकेट घेता आली नव्हती पण त्याला कमी लेखणे गुजरातला महागात पडू शकते. संघाची गोलंदाजी ही सर्वात मोठी ताकद आहे.
दोन्ही संघांत कोणकोणते खेळाडू आहेत?
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि यश दयाल.