
photo- social media
आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वाखालील एका संघाने युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) कडून आरसीबीमधील १०० टक्के हिस्सा १६,७०६ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. या संघात टाइम्स ऑफ इंडिया, बोल्ट ग्रुप आणि ब्लॅकस्टोन यांचा समावेश आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की, नवीन मालकाने ताबा घेतल्यानंतरही आरसीबीचे नाव बदलणार नाही.
वृत्तानुसार, जेव्हा फ्रँचायझीचे नवीन मालक, आर्यमन बिर्ला यांना या प्रकरणाबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नाव बदलणार नाही. हा एक मोठा ब्रँड आहे आणि तो आम्हाला खूप आवडतो.’ यापूर्वी, त्यांची बहीण, अनन्या बिर्ला यांनीही संघाचे नाव बदलणार नसल्याचे सांगितले होते.
आरसीबी ही २००८ पासून आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या आठ फ्रँचायझींपैकी एक आहे. परंतु, विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज खेळाडू संघात असूनही, संघाला आपले पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली. आरसीबीने अखेरीस २०२५ मध्ये आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने २०२६ मध्ये आपले सलग दुसरे विजेतेपद पटकावले. आरसीबीचे जगभरात फॅन्स असून हा एक ब्रँड बनला आहे.
आदित्य बिर्ला ग्रुपचे मालक मंगलम बिर्ला यांचे पुत्र आर्यमन बिर्ला हे स्वतः एक क्रिकेटपटू होते. त्यांनी २०१७ मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मध्य प्रदेश क्रिकेट संघाकडून नऊ प्रथम-श्रेणी सामने व चार लिस्ट-ए सामने खेळले आहेत. ते आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचाही भाग होते. २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना ३० लाख रुपयांना विकत घेतले. परंतु, आर्यमनने २०१९ मध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचे कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. आता ते एक प्रोफेशनल उद्योजक म्हणून काम करत आहेत.