RCB Vs PBKS: Arshdeep Singh became the 'King' for Punjab, created history in IPL..
RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ मधील १८ व्या हंगामात आतापर्यंत ३४ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ३४ वा सामना काल एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाबने बंगळुरूचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने प्रथम फलंदाजी करत ९५ धावा केल्या. तर लक्षाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबने १२ व्या ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक खास कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगने विकेट घेताच इतिहास रचला आहे. अर्शदीप सिंग पंजाब किंग्जकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील १४ षटकांच्या प्रति-साईड सामन्यात, अर्शदीपला हा विक्रम रचण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती. त्याने तिसऱ्याच चेंडूवर फिल साल्टला बाद करून हा पराक्रम केला आहे. हा अर्शदीपचा ७२ वा सामना होता आणि आता त्याच्या नावावर ८५ विकेट्स आहेत. यापूर्वी हा विक्रम पियुष चावलाच्या नावावर नोंदवला गेला होता, ज्याने ८७ सामन्यांमध्ये ८४ विकेट्स मिळवल्या होत्या.
हेही वाचा : Super Over : आयपीएलच्या इतिहासात १५ वेळा सुपर ओव्हरद्वारे निर्णय, पहिला सामना ‘या’ दोन संघात..
अर्शदीपने २०१९ मध्ये पंजाब किंग्ज संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हायपसून त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्याचा प्रवास थेट टीम इंडियापर्यंत जाऊन पोहचला. २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले आणि २०२५ च्या मेगा लिलावात आरटीएम कार्डद्वारे १८ कोटी रुपयांना करारबद्ध केले. तो पंजाबसाठी उत्तम कामगिरी करत आहे.
आरसीबीविरुद्ध, पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. प्रथम त्याने फिल साल्ट आणि नंतर विराट कोहलीला बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. पहिल्याच षटकातील तिसऱ्याच चेंडूवर अर्शदीपने फिल साल्टला बाद केले. त्यानंतर त्याने विराट कोहलीला आपली शिकार केली. या सामन्यात अर्शदीपने ३ षटकांत २३ धावांच्या बदल्यात २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : RCB Vs PBKS : पंजाब किंग्ज पुन्हा विजयाच्या रुळावर, आरसीबीची घरच्या मैदानावर पराभवाची हॅटट्रिक..
अर्शदीपने जुलै २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी टी-२० पदार्पण केले. अर्शदीपने ६३ सामने खेळले आहेत आणि ९९ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. तो भारताकडून टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वात विश्वासार्ह वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा अर्शदीप सिंग याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारताच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो या स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला होता.