RR vs MI : आयपीएल २०२५ चा ५० वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होईल. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळून असणार आहेत. गेल्या सामन्यात गुजरातविरुद्ध ३५ चेंडूत १०० धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे या सामन्यात देखील तो असा काही कारनाम करतो का याकडे लक्ष असणार आहे. तर मुंबई हा सामना जिंकून, मुंबई प्लेऑफसाठीचा आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या सामन्यात, रियान पराग पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. तर मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पंड्याकडे असणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्सच्या संघाने १० सामने खेळले असून ज्यात त्यांनी ३ सामने जिंकले आहेत तर ७ सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे आणि ४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. जाणून घेऊया आजच्या या सामन्याचा पूर्ण तपशील.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरआरने १४ तर एमआयने १५ सामने जिंकले आहेत. तथापि, जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स वरचढ असल्याचे दिसून येत आहे. राजस्थानने घरच्या मैदानावर ८ पैकी ६ सामन्यांमध्ये एमआयला पराभूत केले आहे. १३ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये जयपूरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आरआरचा शेवटचा पराभव झाला होता.
सवाई मानसिंग स्टेडियमच्या पृष्ठभागावर नेहमीच बॅट आणि बॉलमध्ये स्पर्धा दिसून आली आहे. इतर अनेक आयपीएल मैदानांप्रमाणे, येथील खेळपट्टीवर अनेकदा उच्च-स्कोअरिंग थ्रिलर खेळ निर्माण होत नाहीत. तथापि, गेल्या सामन्यात खेळपट्टी वेगळी होती. वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्धचे २१० धावांचे टार्गेट देखील १५.५ षटकांतच पूर्ण केले. अशा परिस्थितीत, आजही चाहत्यांना असाच उच्च-स्कोअरिंग खेळ पाहायला मिळू शकतो.
आज आयपीएलमध्ये जयपूरमध्ये यजमान राजस्थान रॉयल्स आणि पाहुणा मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. आज जयपूरमध्ये हवामान खूप उष्ण असणार आहे. दिवसा तेजस्वी सूर्यप्रकाश असेल तर पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्स : वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश/मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.