जगातील सर्वात जुनी मॅरेथॉन स्पर्धा अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा(Comrades Marathon in South Africa) २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. यात बारामतीचा युवा धावपटू दादासाहेब सत्रे (Dadashaheb Satre) सहभागी होत आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटरमार्टित्झबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
१९२१ मध्ये सुरु झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला वैभवशाली इतिहास आहे. लाखो स्पर्धकांनी यात नशीब आजमावले असून जवळपास १५०० मीटरहून अधिक उंचीच्या पाच मोठ्या आणि सात छोट्या डोंगररांगामधून जाणारी ही स्पर्धा ९० कि.मी. अंतराची आहे. बारा तासात ही स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान धावपटूंपुढे आहे. जगभरातून या स्पर्धेसाठी सोळा हजार धावपटूंनी नोंदणी केलेली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सकाळी पाच अंश सेल्सियस तापमान असते तर दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका बसतो, अशा परस्परविरोधी वातावरणात ही स्पर्धा होत आहे. यात स्पर्धकांच्या शारिरीक आणि मानसिक क्षमतेचा पूर्ण कस यात लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा ग्रामीण भागातील दादासाहेब सत्रे हा पहिलाच धावपटू ठरणार असून त्याने या स्पर्धेसाठी कमालीची मेहनत केली आहे. ही स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे त्याचे ध्येय आहे.