
Maharashtra Police
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्र पोलिस दलात जाहीर करण्यात आलेल्या मेगा भरतीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, एकूण १५,४०५ पदांसाठी तब्बल १६ लाख ५२ हजार ८५० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे एका पदासाठी सरासरी सुमारे १०८ उमेदवारांमध्ये स्पर्धा होत आहे. मुंबईसह राज्यभर राबविण्यात येत असलेल्या या भरतीत शिपाई, चालक, बँडमन, कारागृह शिपाई, एसआरपीएफ आदी विविध पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रियेचा पहिला टप्पा (ऑनलाइन अर्ज) ३० नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार होता. मात्र राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मागणीनुसार ही मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील उच्च शिक्षित तरुणांचा या भरतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा असलेली शारीरिक चाचणी (फिजिकल/फिल्ड टेस्ट) २० जानेवारीपासून सुरू होणार आहे.
या भरतीत सर्वात कमी पदे असलेल्या बँडमन (फक्त १९ पदे) यासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. एका बॅडमन पदासाठी सरासरी ८९५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर कारागृह शिपाई पदांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. ५५४ कारागृह शिपाई पदांसाठी ३ लाख ३४ हजार ८७० अर्ज प्राप्त झाले असून, एका पदासाठी सरासरी सुमारे ६०३ उमेदवार स्पर्धेत आहेत.
काही क्लास कंडक्टर, कोचिंग इनस्टट्यूट्स आणि एजंट उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे खोटे आमिष दाखवून हजारो रुपये उकळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. डमी उमेदवारांच्या माध्यमातून लेखी व शारीरिक परीक्षा पास करून देण्याचे दावे केले जात आहेत. यापूर्वी अशा प्रकारांमुळे अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने उमेदवारांना अशा एजंटांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारी हायटेक नक्कल, बनावट हॉल तिकिटे तसेच शारीरिक चाचणीत पायात चिप बसवून परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखे गैरप्रकार रोखणे, हे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे लेखी परीक्षेसोबतच फिल्ड टेस्टदरम्यानही कडक देखरेख आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
| पद | रिक्त पदे | अर्ज |
|---|---|---|
| शिपाई | १२,७०२ | ७,८६,५०० |
| चालक | ४७८ | १,८०,००० |
| बँडमॅन | १९ | १९,००० |
| कारागृह शिपाई | ५५४ | ३,३४,३५० |
| एसआरपीएफ | १,६५२ | ३,३५,००० |
हे देखील वाचा : ‘तारा’चा अचानक बदलला मूड; 45 मिनिटांत मगरींना चकवा देत तब्बल…, चांदोलीत रंगला थरार