वर्ल्ड चॅम्पियनशिप : साक्षी सूर्यवंशी (Sakshi Suryavanshi) आणि किरणदीप कौर (Kirandeep Kaur) यांचा समावेश असलेल्या भारतीय ५० मीटर पिस्तूल महिला संघाने शुक्रवारी अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या आयएसएस (ISSF) वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये (World Championship 2023) सुवर्णपदक जिंकले. भारतीय त्रिकुटाने १५७३-६x असा एकत्रित गुण नोंदवून पोडियमच्या शीर्षस्थानी स्थान पटकावले. चीनच्या पीपल्स रिपब्लिकने १५६७-९x गुणांसह दुसरे स्थान पटकावले तर मंगोलियाने १५६६-३x च्या एकत्रित गुणांसह कांस्यपदक मिळवले.
पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत, रविंदर सिंग, कमलजीत आणि विक्रम जगन्नाथ शिंदे या भारतीय त्रिकुटाने १६४६-२८x अशा एकत्रित गुणांसह कांस्यपदक मिळवले. चीनने (१६५५-३२x गुण) सुवर्ण, तर रौप्य कोरिया प्रजासत्ताक (१६५४-३०x) ने मिळवले. अजर बैजान या देशांमधील बाकू या शहरामध्ये झालेल्या पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या साक्षी अनिल सूर्यवंशीच्या टीमनं सुवर्णपदक पटकावलं आहे. साक्षी ही मूळची वाळवा तालुक्यातील साखराळे गावची आहे. फ्री पिस्टल ५० मीटर इव्हेंट या प्रकारात तिने हे यश मिळवले आहे. साक्षी सूर्यवंशीच्या टीममध्ये टियाना आणि करणदीप कौर या सहकाऱ्यांचा समावेश आहे.
साक्षी आणि तिच्या सहकाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले असून इस्लामपूर शहराच्या लौकीकातही भर पडली आहे. साक्षी ही इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून सध्या बीसीएच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड तिने सार्थ ठरवून दाखवली आहे.