फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर : चॅम्पियन ट्रॉफी सुरु व्हायला आता फक्त १० दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये आता भारताचा संघ सुरक्षेच्या कारणामुळे युएईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळणार आहे. तर उर्वरित सर्व संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. आता कोणते संघ कशी कामगिरी करतील चॅम्पियन ट्रॉफीमध्ये यावर चाहते त्याचबरोबर क्रिकेट तज्ज्ञ सोशल मीडियावर तर्कवितर्क लावत आहेत. प्रत्येक संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तीन साखळी सामने खेळणार आहे. या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ८ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघाचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
पहिल्या गटामध्ये न्यूझीलंड, पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेश हे संघ आहेत, तर दुसऱ्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे संघ आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी क्रिकेट तज्ञांच्या भाकितांची मालिका सुरूच आहे. या भागात, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने स्पर्धेतील उपांत्य फेरीतील संघांबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की भारत आणि पाकिस्तान बाद फेरीत पोहोचतील आणि जर अफगाणिस्तान संघाने परिपक्वता दाखवली तर त्यांना उपांत्य फेरीचे तिकीटही मिळू शकते.
तुम्हाला सांगतो की, गेल्या दोन आयसीसी स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. टी-२० विश्वचषकात संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला, तर २०२३ च्या विश्वचषकात संघाने ९ पैकी ४ सामने जिंकले, ज्यामध्ये त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या संघांना पराभूत केले. क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, शोएब अख्तरने दुबईतील माध्यमांना सांगितले की, “जर अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत परिपक्वता दाखवली तर ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात. मला विश्वास आहे की पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तान २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. तो पुढे म्हणाला, “जर अफगाणिस्तान संघाने परिपक्वता दाखवली आणि त्यांच्या फलंदाजांनी संयम दाखवला तर ते आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात.”
याशिवाय, रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने आणखी एक मोठी भविष्यवाणी केली, तो म्हणाला की २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात त्याचा संघ भारताला चिरडून टाकेल आणि पुन्हा एकदा चाहत्यांना अंतिम फेरीत दोघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळेल. शोएब अख्तर म्हणाला, “मला आशा आहे की पाकिस्तान २३ फेब्रुवारी रोजी भारताला हरवेल. खरं तर, मला वाटतं की पाकिस्तान आणि भारत दोघेही स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडले पाहिजेत.”
१९ फेब्रुवारी चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. तर पाकिस्तानचा दुसरा सामना २३ फेब्रुवारी रोजी भारताशी होणार आहे. तर तिसरा सामना २७ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे.