इंडियन प्रीमियर लीग ही भारतामध्ये खेळाली जाणारी सर्वात लोकप्रिय अशी क्रिकेट स्पर्धा असून यात परदेशातील अनेक अव्वल क्रिकेटपटूंचा समावेश असतो. न्यूझीलंड संघाचा (New Zealand) माजी कर्णधार रॉस टेलर (Ross Taylor) याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही (IPL) बरेच सामने खेळले आहेत. पण राजस्थान रॉयल्स संघाकडून २०११ साली खेळताना त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक खुलासा त्याने नुकताच सर्वांसोबत शेअर केला.
राजस्थान रॉयल्सच्या एका मालकाने रॉस एका सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला ३ ते ४ वेळा कानशिलात लगावल्याचा धक्कादायक खुलासा रॉसने केला आहे. रॉस टेलरने नुकतेच त्याचे ब्लॅक अँड व्हाईट हे आत्मचरित्र लिहिले आहे, त्यामध्ये त्याने हा खुलासा केला आहे.
रॉस टेलरने याबद्दल सांगितले की, ”आयपीएल खेळताना असं काही माझ्यासोबत घडेल असा मी विचारही केला नव्हता. २०११ साली मोहाली येथे एका सामन्यादरम्यान मी शून्य धावा करुन बाद झालो. त्यानंतर एका राजस्थान रॉयल्सच्या मालकाने मला ३ ते ४ वेळा कानाखाली लगावली.
ही कानशिलात जोरात नव्हती, कदाचित त्यांनी मस्करीत मारली असेल पण हे करताना आम्ही तुला इतके हजारो डॉलर्स शून्यावर बाद होण्यासाठी देत नाही असेही म्हटले होते. त्यामुळे आयपीएलसारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर खेळताना अशाप्रकारच्या वागणूकीचा विचार करत नाही.” रॉसने यावेळी बोलताना न्यूझीलंडच्या क्रिकेटरुममध्येही वर्णभेदाचा अनेकदा सामना करावा लागल्याचा देखील खुलासा केला आहे.