
Indigo Flights Cancellation: BCCI hit by Indigo flights cancellation! Major change in Syed Mushtaq Ali Trophy match schedule
Changes in the schedule of Syed Mushtaq Ali Trophy matches : इंडिगो फ्लाइट रद्द करण्यात आल्यामुळे त्याचा फटका संपूर्ण देशासह बीसीसीआयला देखील बसला आहे. विविध ठिकाणचे लोक विमानतळांवर अडकून आहेत. इंडिगोच्या फ्लाइट रद्दमुळे बीसीसीआयला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीचे सामने स्थलांतरित करावे लागले आहेत. इंदूर येथे होणारे नॉकआउट सामने आता पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. हे सामने मूळतः होळकर क्रिकेट स्टेडियम आणि एमराल्ड हायस्कूल मैदानावर खेळले जाणार आहेत. शेवटचे १२ सामने, सुपर लीग आणि अंतिम सामना १२ ते १८ डिसेंबर दरम्यान येथे पार पडणार होते. परंतु, आता हे सर्व सामने पुण्यात हलवण्यात आले आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे नॉकआउट सामने आता पुण्यातील एमसीए स्टेडियम आणि डीवाय पाटील अकादमी येथे होणार आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सीईओ रोहित पंडित यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने रोहित पंडित यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, त्यांनी बीसीसीआयला १५ दिवस आधीच कळवले होते की ते सय्यद मुश्ताक अली नॉकआउट सामने आयोजित करणे जमणार नाही. इंडिगो फ्लाइट संकटाव्यतिरिक्त, इंदूर ९ ते १२ डिसेंबर दरम्यान जागतिक डॉक्टरांची परिषद देखील आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामुळे तिथिल हॉटेल खोल्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
बीसीसीआयकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आलो आहे. परंतु जगातील सर्वात श्रीमंत बोर्डाला आता गंभीर लॉजिस्टिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बीसीसीआयला अहमदाबाद, कोलकाता, लखनौ आणि हैदराबाद या चार एसएमएटी गट टप्प्यातील ठिकाणांमधून खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि अधिकारी पुण्यात आणावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त, इतर देशांतर्गत स्पर्धा देखील खेळल्या जात आहेत. वृत्तानुसार, जर इंडिगोचे संकट असेच सुरू राहिले तर आठ संघांना, पंच आणि इतर अधिकाऱ्यांना, नॉकआउट सामन्यांसाठी पुण्यात आणणे कठीण ठरण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, महिला अंडर-२३ टी-२० ट्रॉफी आणि पुरुष अंडर-१९ कूचबिहार ट्रॉफी देखील अहमदाबादमध्ये खेळवली जात आहे. ज्यामुळे संघ आणि अधिकाऱ्यांना वारंवार प्रवास करावा लागत आहे.